Home Video सहज सेवा ट्रस्ट’चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!

सहज सेवा ट्रस्ट’चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!

9 second read
0
0
13

no images were found

सहज सेवा ट्रस्ट’चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!

कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’तर्फे सलग २६ व्या वर्षी गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हे अन्नछत्र ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत अहोरात्र सुरू राहणार असून, तब्बल दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.

अविरत सेवेचा रौप्यमहोत्सव आणि २६ व्या वर्षात पदार्पण* २००१ सालच्या चैत्र यात्रेत समाजातील काही संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन अत्यंत सहज भावनेतून या अन्नछत्राची सुरुवात केली. आज या उपक्रमाने आपला रौप्य महोत्सव पूर्ण करून २६ व्या वर्षात अभिमानाने पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणांनी २००१ मध्ये ही सेवा सुरू केली, ते आज सत्तरी-पंच्याहत्तरीत पोहोचले असले तरी, त्याच जुन्या जिद्दीने आणि नव्या पिढीच्या हातात हात घालून ते या अन्नछत्रात पहिल्याच उत्साहाने राबत आहेत.

*१५ हजार चौरस फुटांचा भव्य मंडप आणि अहोरात्र सेवा* वाडी रत्नागिरी येथील जोतिबाची चैत्र यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे सात ते आठ लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यात्रेकरूंची वाढती गर्दी आणि गायमुखावर नव्याने करण्यात आलेली ३००० चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था लक्षात घेऊन यावर्षी अन्नछत्राची भव्य तयारी करण्यात आली आहे. भाविकांना बसून जेवता यावे यासाठी ११० x १४० फूट (१५,००० चौरस फूट) आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला असून, चहा व मठ्ठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आपापल्या गावातून मानाच्या सासनकाठ्या घेऊन पायी चालत येणारे आणि बैलगाडीतून येणारे भाविक कधीही रात्री-अपरात्री डोंगरावर पोहोचतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सहज सेवा ट्रस्टचे हे अन्नछत्र सलग २४ तास खुले असते.

*अन्नाची नासाडी टाळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर* निसर्गाचे रक्षण व्हावे आणि अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी अन्नछत्रात प्लास्टिकला पूर्णपणे फाटा देण्यात आला असून, जेवणासाठी स्टेनलेस स्टीलची ताटे आणि चहा-मठ्ठ्यासाठी स्टीलचे ग्लास वापरले जाणार आहेत. तसेच, डोंगर चढून येणाऱ्या मुक्या प्राण्यांचीही (बैलांची) काळजी घेत त्यांना शेंगदाणा पेंड व भुस्सा देण्याची परंपरा ट्रस्टने कायम ठेवली आहे.

*प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही भोजन सेवा* यात्रा काळात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस दल, होमगार्ड, आरोग्य विभाग, वन विभाग, परिवहन आणि इतर सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनाही ट्रस्टतर्फे भोजन दिले जाते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलिसांच्या मदतीने या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत जेवणाचे पाकिटे पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

*महाप्रसादासाठी लागणाऱ्या साहित्याची भव्यता* या अन्नछत्राचा वाढता विस्तार पाहता त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर तजवीज करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने १५,००० किलो बासमती तांदूळ, ३,००० किलो तूरडाळ, ६,००० किलो रवा, १०,००० किलो साखर, ४५० डबे रिफाईंड तेल, ७,००० लिटर दूध, ३,००० किलो बटाटा, ४,००० किलो कांदा, ३०० किलो काळा घेवडा आणि ट्रकभरून भाजीपाला यांसह ४ टन लाकूड आणि २०० गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. ४०० स्वयंसेवकांची अहोरात्र मेहनत
महाप्रसाद तयार करण्यासाठी २० मुख्य आचारी व त्यांचे मदतनीस, भाजी चिरण्यासाठी ३० महिला, ५० वाढपी, भांडी धुण्यासाठी ७० महिला आणि स्वच्छता राखण्यासाठी ५० मजूर तैनात आहेत. यासोबतच सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त, स्नेही आणि हितचिंतक असे सुमारे ४०० स्वयंसेवक अहोरात्र सेवेसाठी सज्ज आहेत.

*रक्तदान आणि आरोग्य सेवा*
केवळ अन्नदानच नव्हे, तर आरोग्यसेवेचे भान राखत यावर्षी गायमुख परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील सरकारी दवाखाना (सीपीआर) आणि महात्मा गांधी हॉस्पिटल, पारगाव यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल. याव्यतिरिक्त, शासनाच्या आरोग्य विभागामार्फत भाविकांसाठी २४ तास वैद्यकीय सेवा आणि एक रुग्णवाहिका सज्ज असणार आहे.

*मदतीचे आणि सहभागाचे आवाहन*
सहज सेवा ट्रस्टला सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या असून प्रशासनाचेही मोठे सहकार्य लाभत आहे. हा भव्य उपक्रम समाजाच्या मदतीनेच उभा राहतो. त्यामुळे ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना या महायज्ञात देणगीरूपाने मदत करायची आहे, त्यांनी ‘सहज सेवा ट्रस्ट’, ३९८ ई वॉर्ड, आशिष चेंबर्स, वसंत बहार सिनेमा समोर, स्टेट बँक कोषागार शाखा, शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

संस्थेची धर्मादाय आयुक्त आणि आयकर खात्याकडे नोंदणी असून, दिलेल्या देणगीवर आयकर कायदा कलम ‘८०-जी’ (80G) अन्वये सवलत मिळते. अधिक माहितीसाठी ७४४७४ २७५५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…