no images were found
अब्दुललाट येथे ६० एकरातील ऊस जळून खाक
अब्दुललाट :अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सुमारे 50 ते 60 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना आज (दि.१२) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली. ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुपारी एक ते दीड दरम्यान अचानक ऊसाच्या फडाला आग लागली. तीन ते साडेतीनपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बघता बघता अनेक एकरात आग पसरली. सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. ऊस तोडून व पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. उसाला मुद्दाम आग लावली असावी, असा संशय शेतकरी आणि ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
ईनामती , डबाण, बेळकुडे, गवराई, पाटील, भोसले, मगदूम, कुरणे, शेख या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे. तर जवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आगीची झळ पोहोचली नाही. परंतु फडात अनेक लहान कुत्र्यांची पिल्ले मृत अवस्थेत आढळून येत आहे.