no images were found
कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
कोल्हापूर (प्रतिनिधी): अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 34 जागा निवडून आणल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाल्याने केवळ 6 जागांमुळे कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली आहे.
कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या खात्यामध्ये 34 जागा आहेत. भाजपच्या खात्यामध्ये 26 जागा आहेत. शिवसेना शिंदे गट 15 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. महायुतीच्या प्रचारामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं यश लक्षणीय आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि ही अशी एकमेव महापालिका होती ज्या ठिकाणी महायुती झाली होती. काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 34 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिडोर्ले काँग्रेसकडून पुरस्कृत होते ते पराभूत झाले.
कोल्हापूरची लढत उत्तरोत्तर सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच झाली होती. पाटील यांना रोखण्यासाठी महायुतीकडून मोठा डाव टाकण्यात आला. सतेज पाटील यांनी रस्त्यावर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली होती. ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ त्या पद्धतीने कॅम्पेन राबवण्यास सुरुवात केली होती. यानंतर पाटील यांच्या कॅम्पेनमागून महायुती जाताना दिसून आली. पाटील रस्त्यावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरात प्रचाराला यावं लागलं. भाजप प्रदेशाध्यक्ष सुद्धा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आले होते.
दुसरीकडे, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक हायव्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गटाच्या शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला. त्यामुळे सतेज पाटील यांना हा झटका आहे. शारंगधर देशमुखयांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. कोणत्याही परिस्थितीत देशमुख यांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटील यांच्याकडून कंबर कसण्यात आली होती. मात्र, तुल्यबळ लढतीत राहुल माने यांचा शारंगधर देशमुख यांनी पराभव केला. त्यामुळे हा त्यांचा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान, फक्त कोल्हापूर नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 7 ड मधील सर्वाधिक लक्षवेधी लढतीमध्ये कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुरार क्षीरसागर यांनी विजय मिळवला. ही निवडणूक अक्षरशः राज्यांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. प्रभाग क्रमांक सात ड मधून अपक्ष विजय साळोखे रिंगणामध्ये होते. त्यांच्या विरोधात आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर होते. मात्र ही निवडणूक फक्त आमदार पुत्र विरुद्ध अपक्ष विजय साळोखे अशी नव्हती, तर रस्त्यावरचा कार्यकर्ता विरुद्ध आमदार पुत्र अशी होती.