no images were found
मतदानाच्या दिवशी मतदार कामगारांना भर पगारी सुट्टी द्या – जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कामगार विभाग आणि विविध आौद्योगीक असोसिएशन पदाधिकारी व मालक प्रतिनिधी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. यात त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की, दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्हातील आस्थापनांमधील मतदार कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १३५ (ब) नुसार भर पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी याबाबतचे विस्तृत पत्रक जारी केले असून, त्यात निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, शॉपिंग सेंटर, आयटी कंपन्या, कारखाने आदी सर्व आस्थापनांचा समावेश आहे. अपवादात्मक परिस्थितीत (सतत चालणाऱ्या प्रक्रिया किंवा लोकोपयोगी सेवा) कमीत कमी तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक राहील असे जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी सूचित केले . तसेच कोणत्याही आस्थापनांनी मतदाना करीता कामगारांना सुट्टी नाकारल्यास कामगारांनी तात्काळ कामगार विभागाकडे 8788014513 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच संबंधित आस्थापनांना याबाबत काही आक्षेप असल्यास याबाबत दि. १ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या बैठकीस कागल इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन, इचलकरंजी टेक्सटाईल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.