no images were found
महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिले असते : महेश टिळेकर
मुंबई : सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचे पेव आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मध्यवर्ती ठेवून एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवरज’ असे अनेक ऐतिहासिक मराठी चित्रपट येऊन गेले. त्यात अजून भर पडतच आहे. पण बऱ्याचदा ऐतिहासिक चित्रपटांची मांडणी करताना त्यात अनेक बदल केले जातात. काहीवेळा तर मूळचा इतिहासच हलवला जातो असे अनेक प्रकार घडले आहेत. यावरच महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिले असते अशी महेश टिळेकर यांनी सडेतोड पोस्ट लिहून लक्ष वेधले आहे.
महेश टिळेकर म्हणतात, ‘खरा इतिहास वाचून समजून घ्यावा.. दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक मित्राने मला सुचवले की मी गाव तसं चांगलं,वन रूम किचन,हवाहवाई सारखे कौटुंबिक, विनोदी सिनेमे केले आता पुढचा सिनेमा ऐतिहासिक करावा आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर असावा. यावर मी त्याला माझं स्पष्ट मत सांगितलं. ऐतिहासिक सिनेमा तो ही महाराजांच्यावर करायचा तर ते शिवधनुष्य पेलण्याची कुवत माझ्यात नाही आणि बॉलिवूड मध्ये जसं हिरोची एन्ट्री हवेतून उडी मारत गुंडांना मारहाण करत होते.तशी ऐतिहासिक पात्रे दात ओठ खात , बेंबीच्या देठापासून किंचाळत सिनेमातून दाखवणं मनाला पटत नाही.लोकांना आकर्षित करण्यासाठी गल्ला भरण्यासाठी ऐतिहासिक सिनेमात मसाला भरून पुढच्या पिढीला सिनेमातून चुकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा खरा इतिहास पुस्तकातून वाचून समजावा म्हणून मी इतरांना पुस्तके भेट देईन.’
माझं सगळं ऐकून घेऊन मित्राने पुन्हा सल्ला दिला की मला जर चांगला फायनान्स मिळाला तर काय हरकत आहे असे सिनेमे करायला… पण फायनान्स मिळतोय म्हणून स्वतःच्या सोयीप्रमाणे इतिहास बदलून केवळ पैसे मिळवण्यासाठी धंदाच करण्याच्या हेतूने ऐतिहासिक सिनेमा केला तर लोकांच्या शिव्या मिळतीलच.पण जेंव्हा जेंव्हा कुठेही महाराजांची प्रतिमा दिसेल, त्यांचे चित्र समोर येईल तेंव्हा ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी ,त्याचा पराक्रम, इतिहासाशी मी प्रतारणा केल्याचं शल्य मला कायम बोचत राहणार, ती जखम अश्वत्थामाच्या जखमेसारखी मरेपर्यंत न भरून येणारी असेल.’महाराज आज असते तर आपल्याला दरोडेखोर म्हणून तोफेच्या तोंडी दिलं असतं की कडेलोट केला असता याची क्षणभर कल्पना करून पहा.’