Home मनोरंजन “मला आशा आहे की,…. सुंबुल तौकीर खान 

“मला आशा आहे की,…. सुंबुल तौकीर खान 

6 second read
0
0
55

no images were found

“मला आशा आहे की,…. सुंबुल तौकीर खान 

स्वतःचे बलिदान देणाऱ्या महिलेचे चित्रण करण्याची टेलिव्हिजनची परंपरा मोडीत काढत सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने अन्विता (सुंबुल तौकीर खान) ही व्यक्तिरेखा सादर केली आहे, जी परंपरेचा विरोध करण्याचे धाडस दाखवते. एरवी टीव्ही मालिकांमधील महिला या त्यागमूर्ती आणि अत्यंत सोशिक असतात. पण, या मालिकेत अन्विताने आपल्या वडिलांना लिव्हर दान करण्यासाठी आपण पात्र असल्याचे कळल्यानंतरही ते दान न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तिचे वडील अत्यंत गंभीर स्थितीत आहेत आणि तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानेच ते जगू शकणार आहेत. पण अन्विता भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. उलट, ती परिणामांचा शांतपणे विचार करते – खास करून तिच्यावर अवलंबून असलेल्या आपल्या पाच धाकट्या भावंडांचा विचार करते. तिच्यासाठी तिचे स्वतःचे आरोग्य जपणे हा स्वार्थी विचार नसून आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याचा मार्ग आहे.

या भावनिक कथाभागाच्या अनुषंगाने सुंबुल तौकीर खानने शक्ती, करुणा आणि हिंमत याकडे नव्या दृष्टिकोनातून बघणारी अन्विता साकारण्याचा अनुभव शेअर केला.

आपल्या वडिलांना लिव्हर दान करण्याचा धाडसी निर्णय अन्विताने घेतला आहे. हा कथाभाग पहिल्यांदा वाचला तेव्हा तुला काय वाटले होते?

मी जेव्हा हा भाग पहिल्यांदा वाचला, तेव्हा मला आश्चर्य आणि कौतुक दोन्ही वाटले होते. एक मुलगी आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यास नकार देते अशी कहाणी आपल्याकडे सहसा असत नाही. पण मला त्यामागचे कारण समजल्यानंतर तो निर्णय मला योग्य वाटला. अन्विताचा हा निर्णय रागातून किंवा उदासीनतेमधून आलेला नाही. तर भावनिक थकवा आणि विचारांच्या स्पष्टतेमधून आला आहे. ती हे जाणते की, तिने आपले लिव्हर दान केल्यानंतर देखील आपले वडील त्यांच्या जीवनातील वाईट सवयी बदलतीलच याची खात्री नाही. त्यामुळे, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या भावंडसाठी स्वतः निरोगी राहणे तिने पसंत केले. हा निर्णय एका वेगळ्या प्रकारच्या प्रेमातून आला आहे. क्षणिक बलिदानासमोर तिने जबाबदारी आणि आपल्या कुटुंबाच्या दीर्घकालीन कल्याणाचे मोल अधिक मानले आहे.

टीव्हीच्या नायिका सामान्यतः आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करण्यास तयार असतात. अन्विता या पारंपरिक साचा कसा मोडते?

यामुळेच अन्विता खास आहे. मूकपणे आपले सर्वस्व देऊन टाकणारी मुलगी असे तिचे चित्रण केलेले नाही. ती हाडामासाची आहे, हळवी आहे आणि मानवी गुणांनी परिपूर्ण आहे. थोडा कटू पण समंजस निर्णय घेण्यातून तिचे प्रेम दिसते. ही भूमिका करताना खूप छान वाटते आहे, कारण शरणागती पत्करून नाही, तर डोळसपणे निर्णय घेऊन ती आपले वेगळेपण दाखवते. “मला शक्य ते मी सारे केले आहे, पण आता जे शिल्लक आहे, त्याचे रक्षण मला केलेच पाहिजे” हे तिचे म्हणणे आहे. मला वाटते, अनेक महिलांना हा संदेश समजू शकेल की, इतरांची काळजी करताना त्या प्रक्रियेत इतर अनेकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नव्हे.

 अन्विताचा निर्णय धाडसी आहे आणि त्याला अनेक स्तर आहेत; ती स्वार्थी झालेली नाही पण ती व्यावहारिक आहे आणि आपल्या भावंडांचे हित बघते आहे. ही दृश्ये करत असताना तिच्या विचारसरणीचे अर्थघटन तू कसे करतेस?

अन्विताचा निर्णय हा अजिबात स्वार्थीपणातून आलेला नाही. वडिलांविषयीचे प्रेम आणि भावंडांविषयीची जबाबदारी यांच्या पेचात ती सापडली आहे. ती जे करत आहे, ते करण्यासाठी मोठी हिंमत लागते. अपराधी भावना टाळण्यासाठी तसा निर्णय घेण्यापेक्षा जो योग्य आहे त्या निर्णयावर ठाम राहणे अधिक कठीण आहे. ती हे जाणते की, जर तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकून वडिलांचा जीव वाचवला पण तिचे वडील व्यसनमुक्त झाले नाहीत, तर तिची धाकटी भावंडे निराधार होतील. त्यामुळे ती एक कटू पण समंजस निर्णय घेते. माझ्यासाठी, ही खरी ताकद आहे- दूरचा विचार करून सर्वांसाठी जे योग्य आहे ते करणे, मग भले त्या क्षणी तुमचे मन दुखावले जात असले तरी!

अन्विताच्या व्यक्तिमत्त्वातील कोणत्या गुणांशी तुला स्वतःचे सर्वाधिक साम्य दिसते?

तिचा प्रामाणिकपणा आणि भावनिक स्पष्टता माझ्याशी साम्य दाखवते. ती आपल्या अपेक्षांच्या मागे लपत नाही- आपली वेदना, गोंधळ आणि प्रेम ती मुक्तपणे स्वीकारते. सर्वांना पटतील असे निर्णय ती नेहमी घेत नसेल, पण आपल्या भावनांशी ती प्रामाणिक आहे. मला वाटते अशा प्रकारच्या प्रामाणिकपणासाठी हिंमत लागते. तिच्या प्रमाणेच, मला देखील वाटते की ताकद मूक असू शकते- शक्तिशाली असण्यासाठी ते ओरडून सांगणे गरजेचे नसते.

      या मालिकेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे- बलिदान हे नेहमीच प्रेमाचे योग्य रूप असते का? या कथानकातून प्रेक्षकांना काय बोध मिळेल असे तुला वाटते?

मला वाटते, हे कथानक पाहून प्रेम म्हणजे नक्की काय याबाबत प्रेक्षक विचार करतील. कुणावर प्रेम करणे म्हणजे त्याच्यावरून सर्व काही ओवाळून टाकणे असा आपला पूर्वापार समज आहे. पण, ‘इत्ती सी खुशी’ मालिकेतून हे दाखवले आहे की, प्रेम म्हणजे मर्यादा नक्की करणे आणि पुढचा विचार करणे देखील आहे. अन्विताने दिलेला नकार हा तिचे आपल्या वडिलांना नाकारणे नाही; तर ती वेगळ्या शब्दांत हे सांगू पाहात आहे की, “माझे तुमच्यावर प्रेम आहे, पण बाकीच्या कुटुंबाचे देखील मला रक्षण करायचे आहे.” प्रेमाचे हे प्रगल्भ आणि करुणामय रूप आहे जे दूरचा विचार करते. मला आशा आहे की, प्रेक्षक हे समजू शकतील की, ‘नाही’ म्हणण्यातून केवळ नकार दिसत नाही, तर एखाद्याबद्दल वाटणारी काळजी देखील स्पष्ट होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…