no images were found
गारवा बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरची पाठलाग करत हत्या
पुणे : येथील सिंहगड रोडवरील धायरी मध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. सिने स्टाईल थरारक पाठलाग करून कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव भरत कदम (२४)असं आहे. भरत कदम हा तरुण पुण्यातील गारवा बिर्याणी या हॉटेलचा मॅनेजर होता. काम संपवून तो घरी निघाला असताना वाटेत त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
शनिवारी रात्री तो कामावरुन घरी जात असताना त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या भरत कदमच्या मृत्यूनं परिसरात दहशत पसरली आहे. या हत्याकांड प्रकरणी सध्या सिंहगड पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या हत्येचं कारण काय आहे, आणि हत्या कुणी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
तिघांनी बाईकवरुन येऊन भरतची हत्या केली असावी, अशी शंका पोलिसांना आहे. भरतचा तिघांनी आधी पाठलाग केला असावा आणि वाटेत संधी हेरुन मग, त्याच्यावर हल्ला चढवला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. या हत्येचं कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही दरम्यान, आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून या हत्येचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंहगड रोड परिसरात घडलेल्या या हत्याकांडाच्या घटनेनंतर वाढत्या हत्याकांडाच्या घटना चिंता वाढवत आहेत. याप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.