no images were found
“स्वच्छता ही सेवा 2025” अभियानाचा शहरात महापालिकेच्यावतीने शुभारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी ): केंद्रीय शहरी विकास मंत्रालय व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत दरवर्षी साजरा होणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ (स्वच्छता उत्सव) अभियानाचा शुभारंभ आज शहरात करण्यात आला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू मिल येथे धर्मादाय प्रतिष्ठान व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 7.00 ते 12.30 वाजेपर्यंत हि स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
या मोहिमेत धर्मादाय प्रतिष्ठानचे सुमारे 500 सेवकांनी श्रमदान करून परिसराची साफसफाई केली. यासाठी 10 ग्रासकटर मशिनद्वारे तणकट काढण्यात आले. तसेच या उपक्रमाअंतर्गत गंगावेश चौक, शाहू उद्यान व टेंबलाई मंदिर परिसरात महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमातून 40 टन कचरा व प्लॅस्टिक संकलित करण्यात आले.
यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, विभागीय आरोग्य निरीक्षक विकास भोसले, नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, महेश भोसले, सुशांत कांबळे, सुरज घुणकीकर, विनोद नाईक, मुकादम व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत सरकारचे केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) यांनी स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ (स्वच्छता उत्सव) ही मोहिम दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान देशभरात राबविण्यात येत आहे. या swachhta Pledge स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी हि स्वच्छता मोहीम राबविणे हा आहे. या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग तसेच स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देणे, तसेच पर्यावरण पूरक पद्धतीने उत्सव साजरा करणे हा मुख्य उद्देश आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व त्यांचे परिवर्तन करणे, सार्वजनिक जागांची स्वच्छता करणे, सफाई मित्र सुरक्षा शिबिर घेणे, स्वच्छ हरित महोत्सव आणि स्वच्छता पुरस्कार या घटकांचा समावेश आहे. सार्वजनिक जागांची स्वच्छता अंतर्गत सर्व संस्था, शैक्षणिक इमारती, व्यवसायिक, मार्केट क्षेत्रे, सार्वजनिक परिवहन केंद्रे, रस्ते महामार्ग, रेल्वे स्टेशन, अभयारण्य, प्राणी संग्रालये, संरक्षित क्षेत्रे, जलस्त्रोत नद्या, नाले, तलाव, सरोवर, बगीचे, पर्यटन स्थळे, अध्यात्मिक प्रार्थना स्थळे व परिसर स्वच्छ ठेवणेबाबतचे शहरातील नागरीकांना आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे.