Home आरोग्य प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती : प्रत्येक पुरुषासाठी आवश्यक माहिती:डॉ. श्रीकांत जय, 

प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती : प्रत्येक पुरुषासाठी आवश्यक माहिती:डॉ. श्रीकांत जय, 

47 second read
0
0
122

no images were found

प्रोस्टेट कॅन्सर बाबत जनजागृती : प्रत्येक पुरुषासाठी आवश्यक माहिती:डॉ. श्रीकांत जय, 

सप्टेंबर महिना जगभरात प्रोस्टेट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक असून विशेषतः 50 वर्षांनंतर त्याचा धोका वाढतो. मात्र जागरूकतेचा अभाव आणि पुरुषांच्या आरोग्याबाबत बोलण्यास होणारा संकोच यामुळे हा आजार अनेकदा उशिरा ओळखला जातो. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर तर्फे या आर्टिकलचा उद्देश म्हणजे पुरुष आणि त्यांच्या कुटुंबीयांना या आजाराबद्दल योग्य माहिती देणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

प्रोस्टेट म्हणजे काय?                                   

प्रोस्टेट ही एक छोटी ग्रंथी आहे, अंदाजे अक्रोडाएवढ्या आकाराची, जी मूत्राशयाखाली आणि मलाशयासमोर असते. याचे मुख्य काम म्हणजे शुक्राणूंना पोषण आणि संरक्षण देणारे द्रव तयार करणे. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा प्रोस्टेटमधील पेशी अनियमितरीत्या वाढू लागतात, ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होतो.

कोणाला जास्त धोका असतो?

वय जसजसे वाढते, विशेषतः वयाच्या  50 वर्षांनंतर, प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. घरात वडील किंवा भाऊ यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल तर धोका आणखी वाढतो. त्याशिवाय लठ्ठपणा, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळेही हा धोका वाढू शकतो.

लक्ष द्यावीत अशी सामान्य लक्षणे

सुरुवातीच्या टप्प्यात प्रोस्टेट कॅन्सरची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच जागरूकता आणि नियमित तपासणी खूप महत्त्वाची आहे. लक्षणे दिसू लागल्यास ती पुढीलप्रमाणे असू शकतात –

·        लघवी करताना त्रास होणे

·        वारंवार लघवी लागणे, विशेषतः रात्री

·        लघवीचा प्रवाह कमकुवत होणे किंवा मध्येच थांबणे

·        लघवीत किंवा वीर्यात रक्त दिसणे

·        पाठ, कंबर किंवा ओटीपोटात सतत वेदना होणे

ही लक्षणे नेहमीच कॅन्सरमुळे असतील असे नाही. प्रोस्टेटच्या इतर नॉन-कॅन्सर आजारांमध्येही अशीच लक्षणे दिसू शकतात. मात्र, ही लक्षणे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

तपासणीचे महत्त्व

पीएसए (प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन) नावाची साधी रक्त तपासणी आणि डॉक्टरांकडून केलेली शारीरिक तपासणी यामुळे प्रोस्टेट कॅन्सर लवकर ओळखता येतो. लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी आणि कमी कठीण होतात. 50 वर्षांवरील पुरुषांसाठी ही तपासणी विशेषतः महत्त्वाची आहे, आणि ज्यांच्या कुटुंबात या आजाराचा इतिहास असेल, अशा पुरुषांनी 45 वर्षांपासून तपासणी करून घ्यावी.

प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार होऊ शकतो का?

होय. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे प्रोस्टेट कॅन्सर लवकर ओळखला गेला तर तो अनेकदा पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचाराच्या पद्धतींमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फक्त लक्ष ठेवणे (सक्रिय देखरेख), शस्त्रक्रिया, किरणोउपचार (रेडिएशन) आणि नव्या प्रकारच्या लक्षित उपचारांचा समावेश होतो. योग्य उपचाराचा निर्णय आजाराच्या टप्प्यावर आणि रुग्णाच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असतो.

आपण काय करू शकतो?

·         लघवीसंबंधी त्रास कधीही दुर्लक्ष करू नका. त्वरित तपासणी करून घ्या.

·         निरोगी जीवनशैली स्वीकारा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तंबाखू टाळल्यास धोका कमी होतो.

·         मोकळेपणाने बोला. पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी कुटुंबात लपवू नका.

शेवटचा सल्ला

प्रोस्टेट कॅन्सर लवकर ओळखला तर तो घातक आजार नाही. जागरूक राहणे, वेळेवर तपासणी करणे आणि तज्ञ यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडतो. या प्रोस्टेट कॅन्सर जनजागृती महिन्यात आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणाला लघवीसंबंधी त्रास असेल, तर तर उशीर न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉ. श्रीकांत जय

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…