no images were found
प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना वाढीव अधिकार – नागरिक सेवांच्या कामकाजात गती प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून चार वॉर्ड ऑफिस सक्षम करण्याचा निर्णय
कोल्हापूर, (प्रतिनिधी ): महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांना प्रदान केलेले किंवा त्यांच्याकडे सोपवलेले अधिकार आता प्रभाग स्तरावर अधिक विकेंद्रित करण्यात आले आहेत. याबाबत प्रशासक के.मंजूलद्वमी यांनी त्यांचे अधिकाराचे विकेंद्रित करत असल्याचे आदेश काढला आहे. कलम 69 व कलम 49 नुसार आयुक्तांकडून अति-आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्त यांना अधिकार व जबाबदाऱ्या सोपविण्याची तरतूद असून त्याचाच अवलंब करून कोल्हापूर महानगरपालिकेत चार प्रभाग क्षेत्र कार्यालयांमार्फत नागरिकांना अधिक वेगाने व कार्यक्षमतेने महापालिकेच्या सेवा मिळणार आहेत.
वित्तीय अधिकारात वाढ
31 डिसेंबर 2016 रोजीच्या आदेशानुसार प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना महसुली खर्चासाठी 20 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये इतकी अधिकतम मर्यादा होती. मात्र नव्या निर्णयानुसार अ-महसुली खर्च, अ-भांडवली खर्च, क-महसुली खर्च, क-भांडवली खर्चात प्रभाग क्षेत्र अधिकारी (कार्यक्षेत्र मर्यादेत) यांना पुर्वी प्रदान करणेत आलेली वित्तीय अधिकाराची मर्यादा 50 हजारांवरून थेट 1 लाख रुपये करण्यात आली असून, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतच्या कामांची मंजुरी प्रभाग स्तरावर दिली जाऊ शकणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या तातडीच्या व आवश्यक कामांना गती मिळेल.
प्रभागनिहाय जबाबदाऱ्या
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी चार प्रभागांत सहाय्यक आयुक्तांना प्रभाग अधिकारी म्हणून व नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्तांची नियुक्त केलेली आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 गांधी मैदानसाठी सहा. आयुक्त उज्वला शिंदे यांचे नियंत्रण अधिकारी उप-आयुक्त कपिल जगताप, विभागीय कार्यालय क्र.2 छत्रपती शिवाजी मार्केटसाठी सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांचे नियंत्रण अधिकारी उप-आयुक्त परितोष कंकाळ, विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपुरीसाठी सहा. आयुक्त संजय सरनाईक यांचे नियंत्रण अधिकारी उप-आयुक्त किरणकुमार धनावडे व विभागीय कार्यालय क्र.4 ताराराणी मार्केटसाठी सहा.आयुक्त कृष्णा पाटील असतील. हे सर्वजण त्यांना नेमून दिलेल्या नियंत्रण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील दैनंदिन कामकाज सांभाळतील.
प्रमुख जबाबदाऱ्या
प्रभाग अधिकारी हे संबंधित प्रभागातील महसूल, इस्टेट, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, तसेच वर्कशॉप विभागाच्या कामांचे प्रत्यक्ष पर्यवेक्षण करतील. घरफाळा व इस्टेट विभागाची देखरेख, वसुली व रेकॉर्ड ठेवणे, कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजा मंजुरी, उपस्थिती तपासणी व शिस्तभंगा विषयक प्रस्ताव पाठविणे व नियंत्रण ठेवणे, इस्टेट विभागाअंतर्गत असणाऱ्या मालमत्तांचे रेकॉर्ड ठेवणे तसेच वसुली व अनुषंगिक विकास करणे. पाणीपुरवठा विभागाचे कामकाज पाहून नियंत्रण ठेवणे व नियोजन करणे. प्रभाग क्षेत्रांतर्गत कार्यरत स्वच्छता विषयक कामकाजाचे सनियंत्रण करणे. आठवडयातून 3 दिवस प्रत्यक्ष साईट व्हीजीट करणे, सर्व आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक, सर्व मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांच्या किरकोळ रजा मंजुरीचे अधिकार, वर्कशॉप विभागाकडून प्रभागासाठी देण्यात येणाऱ्या वाहनांचे नियोजन, सनियंत्रण, वाटप करून आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग व पवडी विभाग यांच्यामध्ये कामाच्या गरजेनुसार उपलब्ध वाहन व यंत्रसामग्रीचे नियंत्रण व नियोजन करणे. प्रभाग क्षेत्रांतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून निराकरण करणे. आयुक्तांच्या दौऱ्यावेळी भागातील सर्व संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसह उपस्थित राहणे व समन्वय साधणे. प्रभाग क्षेत्रांतर्गत होर्डिंग, बॅनर यांना परवानगी देणे तसेच रस्ता खुदाई व इतर परवानगी देण्याचे अधिकार असतील. महापालिकेच्या धोरणानुसार संबंधित विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करणे, प्रभाग क्षेत्रांतर्गत निवडणूक विषयक कामकाज, जनगणना विषयक कामकाज तसेच इतर अनुषंगिक कामकाज पार पाडणे. आपत्ती व्यवस्थापन, गणेशोत्सव तसेच इतर सण उत्सव, विशेष कार्यक्रम, मान्यवरांचे दौरे याबाबत भागात महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहणे. प्रशासक तसेच नियंत्रण अधिकारी यांनी वेळोवेळी सोपवलेल्या सह नियंत्रणाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे अशा जबाबदा-या देण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांसाठी थेट संवाद
प्रभाग अधिकारी प्रत्येक मंगळवारी दोन तास नागरिक भेटीचा वेळ राखीव ठेवणार आहेत. यावेळी प्रभागातील लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून तात्काळ कार्यवाही करतील. तसेच संबंधित उप-आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी हे स्वत: या वेळी कार्यालयात हजर राहतील. त्यामुळे नागरीकांच्या असणा-या तक्रारी विभागीय कार्यालय स्तरावर विहित मुदतीत निर्गत होतील. नागरीकांनी आपल्या तक्रारी आता विभागीय कार्यालय स्तरावर कराव्यात या तक्रारी आता नियंत्रण अधिका-यांमार्फत तात्काळ सोडिविल्या जाणार आहेत.
कामकाजावर लक्ष
प्रभाग अधिकारी यांनी मुख्यत्वे स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यविषयक व इतर तातडीच्या बाबींवर वित्तीय अधिकारांचा वापर करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर नियमित स्थळ पाहणी करून प्रभागातील विकासकामांवर वेळोवेळी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी आयुक्त कार्यालयात या सर्व अधिका-यांची बैठक घेऊन तसे निर्देश दिले आहेत.