no images were found
एड्स निर्मूलन जनजागृतीसाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, : युवक हा देशाचा कणा असून, युवकांनी या वयात समाज जागृतीसाठी अग्रेसर राहावे. एचआयव्ही, एड्स नियंत्रणासाठी यात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स नियंत्रण विभाग,सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीने दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस ‘युथ आयकॉन’ म्हणून तर नेट फाउंड्री व कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमोल कोडोलीकर, निवासी बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी आटोक्यात येत असली तरी सर्वांनी सजग राहणे फार महत्त्वाचे आहे. यासाठीच युवकांनी एड्स नियंत्रणासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करावी.
जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस म्हणाल्या, युवकांनी खेळ, व्यायामा सोबतच सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असून एड्स नियंत्रणासाठी पुढाकार घ्यायला हवा.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविकामध्ये 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगून, एड्स नियंत्रणामध्ये युवकांची भूमिका समजावून सांगितली.
या स्पर्धेत राजर्षी शाहू कॉलेज रुकडी, ता. हातकणंगलेचा विद्यार्थी अनिकेत संतोष शिनगारे याने मुलांमध्ये प्रथम, ओंकार संभाजी पाटील, विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे याने द्वितीय तर आशुतोष सुदर्शन भातमारे, चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज, हुपरी याने तृतीय क्रमांक मिळवला.
मुलींमध्ये आर. के. कॉलेज गडहिंग्लजची प्रेरणा पुंडलिक जोशीलकर हिने प्रथम, यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.) कॉलेज कोल्हापूरची नम्रता नारायण बेळगावकर हिने द्वितीय तर निकिता रणजीत कोपार्डे, महावीर महाविद्यालय कोल्हापूर हिने तृतीय क्रमांक मिळविला.पहिल्या दोन क्रमांक विजेत्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्यांना मेडल, रोख रक्कम व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे प्रायोजक नॅट फाउंड्रीज, कोल्हापूर फर्स्ट आणि ॲस्टर आधार हॉस्पिटल यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सीपीआर समाजसेवा विभागाचे विभाग प्रमुख शशिकांत राऊळ, समाज सेवा विभागाचे सीएसआर इन्चार्ज महेंद्रसिंह चव्हाण, कोल्हापूर फर्स्टचे ॲड. सर्जेराव खोत, सचिन शानभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर उपस्थित होते.
स्पर्धेचे संयोजन मकरंद चौधरी, कपिल मुळे, विनायक देसाई, संदीप पाटील, संजय गायकवाड, दीपक सावंत, मनीषा माने ,शिल्पा अष्टेकर, पल्लवी देशपांडे यांनी केले. जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. यावेळी एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी तसेच एड्स नियंत्रण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी तर आभार जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी मानले.