no images were found
शहरातील रस्त्यांचे डांबरी पॅचवर्कचे नियोजन करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर,(प्रतिनिधी):– गणेश उत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे पॅचवर्कची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आताच नियोजन करण्याचे आदेश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयुक्त कार्यालयात सकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी वॉरंटी कालावधीत असलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क ठेकेदारामार्फत करून घेण्यावर भर दिला. तसेच, गणेशोत्सवासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शहर अभियंता यांनी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत प्रमुख रस्ते व मिरवणूक मार्गांची आजच पाहणी करून डांबरी पॅचवर्कच्या कामांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या. श्री गणेश आगमन, मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी विद्युत व्यवस्था सुरळीत करावी. मंडप व बॅरिकेटींगची कामे वार्षिक ठेकेदारामार्फत करुन घ्यावीत. तसेच वाहन व हमाल व्यवस्थेचे मागील वर्षीप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मंडप उभारणीसाठी दिलेल्या परवानगीच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सर्व उपशहर अभियंता यांना देण्यात आले. इराणी खणी येथील स्वयंचलित यंत्रसामग्रीची देखभाल व दुरुस्ती तातडीने पूर्ण करून ती कार्यक्षम स्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. बचत गटामार्फत विभागीय कार्यालयांमध्ये तसेच इराणी खण येथे जेवण, चहा आणि नाश्त्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. इराणी खण येथे गणेशमुर्ती विसर्जनासाठी चार क्रेन उपलब्ध ठेवाव्यात. तर मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्याचे कामही करण्यात यावे. विसर्जनासाठी विविध पथके आणि कर्मचारी नियुक्त करून मागील वर्षीप्रमाणे नेटके नियोजन करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, अरुण गुजर, निवास पोवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी, सहा.अभियंता यांत्रिकी विजयकुमार दाभाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.