Home शैक्षणिक प्राध्यापक’ दिगंबर शिर्के यांनी अधिविभागात घेतले अखेरचे लेक्चर!

प्राध्यापक’ दिगंबर शिर्के यांनी अधिविभागात घेतले अखेरचे लेक्चर!

1 second read
0
0
68

no images were found

प्राध्यापक’ दिगंबर शिर्के यांनी अधिविभागात घेतले अखेरचे लेक्चर!

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्यांच्या शिक्षक म्हणून अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देऊन अधिविभागाचा निरोप घेतला. नियत वयोमानानुसार डॉ. शिर्के आज संख्याशास्त्र अधिविभागातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.

आजचा काळ स्मार्ट क्लासरुम शिक्षणाचा असला तरी सच्चा हाडाच्या शिक्षकासाठी मात्र खडू, फळा आणि डस्टर या साधनांचेच आकर्षण असते. साधारण ४० वर्षांपूर्वी जून १९८५ मध्ये डॉ. शिर्के हे विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात दाखल झाले. तेथपासून ते आजतागायत त्यांची संपूर्ण कारकीर्द शिवाजी विद्यापीठातच घडली, साकार झाली. विद्यार्थीदशेत असतानाच डॉ. शिर्के यांनी खडू, फळा आणि डस्टरधारी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. शिक्षकापासून ते अधिविभाग प्रमुख पदापर्यंत आणि प्रशासनातील कुलसचिव पदापासून ते कुलगुरू पदापर्यंत त्यांनी सर्व पदे यशस्वीरित्या भूषविली. प्रशासनात असतानाही त्यांनी वेळोवेळी अधिविभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यापन केले. शिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या दिवशीही आपण विद्यार्थ्यांसमोर खडू, फळ्यावर लेक्चर घ्यावयाचे, अशी सुप्त इच्छा डॉ. शिर्के यांच्या मनी होती. ती त्यांनी आज त्यांच्या शिक्षक पदाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण केली.

सदर व्याख्यानासाठी ते नेहमीप्रमाणे अर्धा तास आधीच संख्याशास्त्र अधिविभागात उपस्थित झाले. शिकवावयाच्या विषयाचा अभ्यास केला. आवश्यक नोट्स तयार केल्या आणि वर्गात प्रवेश केला. त्यांनी “स्टॅटिस्टिकल सिम्युलेशन अँड इट्स अॅप्लीकेशन्स” या विषयावर अतिशय सोप्या पद्धतीने, सुसंगत उदाहरणांसह व्याख्यान दिले.

या व्याख्यानात त्यांनी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या ‘दि अमेरिकन स्टॅटिस्टिशियन’ या मान्यताप्राप्त शोधपत्रिकेमध्ये १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील ‘आयलस कॉन्स्टंट’ (e) संदर्भातील संख्याशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्या संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांच्या आकलनास अनुरूप अशा शब्दांत मांडल्या.

विशेष म्हणजे, अधिविभागात स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट बोर्ड असतानाही त्यांनी हा विषय खडू आणि फळा अशा पारंपरिक पद्धतीने शिकविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या विषयावर आधारित पुढील अभ्यास आणि संशोधनाच्या दिशांचे स्वरुप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्राध्यापक शिर्के यांनी आपल्या अधिविभागातील शिक्षक म्हणून अखेरच्या व्याख्यानाचा समारोप केला. कोणताही औपचारिक निरोप नाही, समारंभ नाही, पुष्पगुच्छांची देवाणघेवाण नाही, झाली ती केवळ विचारांची देवाणघेवाण. कुलगुरू पदाचा बडेजाव न मिरविता एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किती निरलस भावनेने निवृत्तीकडे सरकता येते, याचा वस्तुपाठच जणू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निमित्ताने घालून दिला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…