no images were found
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
11 ते 17 ऑगस्ट दरम्यान उपक्रम
कोल्हापूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा लावायचा असून या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ व अन्य उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सर्व संस्था, कार्यालयांच्या इमारतींवर तसेच प्रत्येक नागरिक आपापल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जनजागृती करा. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करुया, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्या. राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होईल, याची खात्री करा. विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्याबरोबरच या केंद्रांना ध्वजाचा आकार व अन्य अनुषंगिक बाबींच्या सूचना द्या. भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करा. नागरिकांनी तिरंगा स्वेच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरीत करा, तसेच या उपक्रमाची रुची निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी दिल्या.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय इमारती, फ्लॅट व घरांची माहिती घेऊन त्यानुसार हा उपक्रम चांगल्याप्रकारे राबविण्यात येईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावांतील अधिकाधिक ग्रामस्थ सहभागी होतील, यादृष्टीने नियोजन करुन या मोहिमेत सर्वांचा सहभाग घ्यावा व ग्रामीण भागात ही मोहीम यशस्वी करावी.
बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.