no images were found
हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे
सर्जा सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अनेक सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंखे लवकरच स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसली मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा आहे. ती गावाची जणू आईच आहे. वरकरणी अत्यंत प्रेमळ भासत असली तरी कमालीची सत्तालोलुप आणि पाताळयंत्री आहे. तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती काहीही करु शकते. घर आणि गावाची सगळी सूत्र तिच्या हातात आहेत. गावची सरपंच पदाची निवडणूक जिंकण्याचं तिचं ध्येय आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ती आपला मुलगा दुष्यंत आणि गावातली सर्वसामान्य शेतकरी मुलगी कृष्णाचं लग्न करुन देण्यासही तयार होते.
बाळजाबाईची ही भूमिका साकारत असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे यांनी स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकेतून भेटीला येणार आहेत. बाळजाबाई या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘या मालिकेत मी खलनायिका साकारते आहे. एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारताना कस लागतो. बाळजाबाई हे अत्यंत प्रभावशाली असं पात्र आहे. दोन मुखवटे घेऊन वावरणारी. म्हणजे समाजात वावरताना ती जितकी नम्रपणे वागते तितकीच ती धूर्त आहे. बाळजाबाईचं वागणं, बोलणं, तिचं रहाणीमान या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करतेय. बाळजाबाई हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका हळद रुसली कुंकू हसलं ७ जुलैपासून दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’