
no images were found
दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे दशपैलू व्यक्तीमत्व – ज्येष्ठ संशोधक डॉ.जयसिंगराव पवार
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठ आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे स्मृती व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवार दि. 14 मे रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या व्याख्यानाने झाला.
या व्याख्यानमालेच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के तसेच प्र-कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. शांतिनाथ कांते, व्हाईस चेअरमन श्री. चंद्रकांत पाटील, मानद सचिव श्री. सुहास पाटील, लठ्ठे फौंऊंडेशनचे विश्वस्त डॉ. भरत लठ्ठे, व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ”सत्यशोधक आण्णासाहेब लठ्ठे” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करून आण्णासाहेब लठ्ठेंच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांचे व्यक्तीमत्व दशपैलू असून राजर्षी शाहू महाराज यांची कृती आणि विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी केले आहे. आण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याची ओळख करून देताना त्यांनी आण्णासाहेब लठ्ठे हे सत्यशोधक विचारवंत, ब्राम्हणेतर नेता, उत्तम व कार्यक्षम प्रशासक, अर्थतज्ञ, अर्थमंत्री, समाजसुधारक व धर्मसुधारक, पत्रकार, कायदेतज्ञ, शाहू चरित्रकार, करवीररत्न, दिवाणबहाद्दूर, प्राध्यापक असे बहूआयामी व्यक्तीमत्व त्यांना लाभले होते. आण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र नवसंशोधकांना एक साधनग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरेल असे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. शाहू महाराजांनी कोल्हापूर मध्ये बोर्डींग व वस्तीगृहे स्थापन करण्यासाठी लोकांना उद्युक्त केले. शिक्षण हे सर्व सुधारणांची गुरूकिल्ली असल्याचा विचार त्यांनी मांडला. आण्णासाहेब लठ्ठे एक थोर समाजशिक्षक होते. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता नष्ट करून समाजातील सर्व घटकांना समान संधी व समान स्वातंत्र्य मिळावे यासाठी पुढाकार घेतला. सत्यशोधक समाज घडविण्याचा हा मूलभूत गाभा असल्याचा विचार त्यांनी समाजापुढे मांडला. सत्यशोधन म्हणजे समाजशिक्षण हा विचार आण्णासाहेब लठ्ठे यांनी मांडला. आपल्या मधील हीनत्वाची भावना बाजूला ठेवली पाहिजे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानातील आण्णासाहेब लठ्ठे यांचे योगदान तसेच त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. शाहू महाराजांच्या तीन पिढयांशी आण्णासाहेब लठ्ठे यांचे घनिष्ट संबंध होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आण्णासाहेब लठ्ठे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. 21 व्या शतकातील समाजाने आण्णासाहेब लठ्ठेंचे विचार पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. राजर्षी शाहू महाराज आणि आण्णासाहेब लठ्ठे या दोन व्यक्तीमत्वांमध्ये ‘सत्यशोधक’ हा समान विचार असल्याचे मत व्यक्त केले. आण्णासाहेब लठ्ठेंच्या कर्तृत्वावर लहान पुस्तिका प्रकाशित करावी हा विचार व्यक्त केला.
या व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. शांतिनाथ कांते यांनी केले. लठ्ठे फौंऊंडेशनचे विश्वस्त डॉ. भरत लठ्ठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘अमेरिकेतील वैचारिक गुलामगिरी भारतात येऊ घातली आहे’ असे मत व्यक्त केले. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्लॅस्टिकचा कचरा, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, भ्रष्टाचार या प्रमुख समस्या असून पुढील पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शाहू महाराज व स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने प्रकाशित केलेला ”दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे : काळ आणि कर्तृत्व” हा ग्रंथ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आण्णासाहेब लठ्ठे यांनी 1924 मध्ये लिहिलेल्या छ. शाहू महाराज यांच्यावरील इंग्रजी भाषेतील चरित्र ग्रंथाच्या पुनरावृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मानलेे. या कार्यक्रम प्रसंगी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व प्रशासकीय सेवक मोठया संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे संयोजन लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने करणेत आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. हेमा माणगावे व प्रा. सौ. पद्मजा पाटील यांनी केले.
……………..