
no images were found
जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
कोल्हापूर, : अल्पसंख्याक समाजाच्या जिल्हास्तरावरील अडचणी तातडीने सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील तसेच शासन स्तरावरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.
यावेळी अल्पसंख्याक समुदायाकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती उद्योग अधिकारी रवी साखरे यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्यांकांना कायद्याने दिलेले हक्क व अधिकार याबाबत ॲड मुनाफ मनेर तर प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी “अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अपर्णा चौगुले यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व अल्पसंख्याक समुदायातील मान्यवर नागरिक, विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समाज कल्याण विभागाचे सहकार्य लाभले.
यावेळी विविध अल्पसंख्याक संघटनांच्या प्रतिनिधींनी समाजाच्या अडचणी, मागण्यांबाबत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदने दिली.