
no images were found
माजी सैनिकांचा शिवाजी विद्यापीठात सन्मान
कोल्हापूर, (प्रतिनिधी):– “देशभक्ती सप्ताह” साजरीकरण अंतर्गत शिवाजी विद्यापीठांमध्ये सिक्युरिटी विभागा मध्ये कार्यरत असलेले संरक्षण दलातील माजी सैनिक व अधिकारी यांनी देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के, प्र कुलगुरू, प्रा डॉ पी एस पाटील आणि कुलसचिव, डॉ व्ही एन शिंदे यांच्या हस्ते गौरव चिन्ह आणि शाहू महाराजांचे चरित्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यापीठाच्या सेवेत असणारे एकूण 37 माजी संरक्षण दलातील सेवकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चीफ सेक्युरिटी ऑफिसर श्री शिवाजी शिंदे त्याचबरोबर बोर्ड ऑफ स्टडीचे उप कुलसचिव डॉ. एस एम कुबल यांनी आपले सेवेतील अनुभव सर्वांसमोर मांडले. कारगिल युद्ध दरम्यान त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आणि केलेल्या कामगिरीबद्दल विशेषत्वाने उल्लेख केला. कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के यांनी देशसेवा करणाऱ्या सर्वच संरक्षण दलातील जवानांबद्दल आदराची भावना व्यक्त केली. देशसेवा, देशप्रेम, देशभक्ती या ध्येयाने ते आपली सेवा देशाला समर्पित करून देशाच्या नागरिकांचे संरक्षण करतात म्हणून देशातले नागरिक सुखाने झोपू शकतात असे ते म्हणाले. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ. टी एम चौगले यांनी केले तर आभार कुलसचिव, डॉ. व्ही एन शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विकास विभाग प्रशासकीय सेवक उपस्थित होते.