no images were found
अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे, हे यापूर्वी आपल्याला कळलेच आहे. आता यातील एक-एक पुष्प आपल्या समोर येत असून प्रेमगीत आणि रॅप साँगनंतर आता ‘मेल्याहून मेल्यागात’ हे सिद्धार्थ जाधववर चित्रीत गाणे आपल्या भेटीला आले आहे. या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे. वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणारा सिद्धार्थ या गाण्याच्या माध्यमातून काहीतरी सांगू पाहात आहे. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसत आहे.
या गाण्याबद्दल संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “हा एक सांगितिक चित्रपट असल्याने या गाण्यांच्या माध्यमातूनच कथा पुढे जाणारी आहे. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत असणे आवश्यक होते. यापूर्वीही सांगितले आहे की प्रत्येक गाण्यात आम्ही काही प्रयोग केले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणे गायला असून त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. इतर गाण्याप्रमाणे हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.”
‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ संगीताच्या माध्यमातून व्यक्तिरेखेची ओळख होणे, कथा पुढे जाणे ही संकल्पनाच खूप अनोखी आहे आणि प्रत्येक गाण्यात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा संजय जाधव यांचा प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह आहे. यात त्यांना संगीत टीम उत्कृष्ट लाभल्याने या सगळ्याच गाण्यांना चारचाँद लागले आहेत. काहीतरी गूढ उलगडणारे हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.’’
प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.