
no images were found
गौरव चोप्रा चे 5 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेतील हृदयस्पर्शी आणि आपल्या जीवनाशी सुसंबद्ध कथानकामुळे प्रेक्षकांना ही मालिका भावली आहे. या मालिकेत आता सुपरिचित अभिनेता गौरव चोप्राची एंट्री होणार आहे. प्रोफेसर राजवीर शास्त्री या चाणाक्ष, काहीशा विक्षिप्त कायद्याच्या प्राध्यापकाच्या रूपात तो दिसणार आहे. कोर्टात दमदार स्वरूपात वकिली करण्याबद्दल तो ओळखला जातो.
एका नवीन लक्षवेधी अध्यायात, प्रोफेसर राजवीर शास्त्रीच्या एंट्रीने कथानकाला एक नाट्यमय वळण मिळते. एकेकाळचा कायद्यात तज्ज्ञ असलेला प्रोफेसर शास्त्री आता कडवट आणि शंकेखोर झाला आहे. कोर्टात उत्कृष्ट युक्तिवाद करणाऱ्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या राजवीरची कारकीर्द एका घोटाळ्यामुळे नष्ट झाली आहे. त्याचा व्यावसायिक नावलौकिक तर त्यात धुळीचा मिळालाच, पण त्याच्या व्यक्तिगत जीवनाला देखील त्याची झळ लागली. त्याचा विवाह आणि मुलीशी असलेला बॉन्ड देखील संपुष्टात आला. फसवणुकीचा आणि पश्चात्तापाचा बळी ठरलेला राजवीर राग आणि दारूच्या मागे आपल्या मनातील वेदना लपवत असतो. आपली माणसे आणि कायदा प्रणाली या दोन्हीवरून त्याचा विश्वास उडालेला आहे. पण, जेव्हा पुष्पा त्याच्या आयुष्यात येते, तेव्हा परिस्थिती बदलू लागते. पुष्पा ही अढळ सकारात्मकता आणि आशेचे मूर्तिमंत रूप आहे. पुष्पाची अपार ऊर्जा राजवीरच्या हरलेल्या उत्साहाला आव्हान देते आणि या दोन विसंगत दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये एक दमदार आणि भावनात्मक नात्याचा मार्ग खुला होतो.
पुष्पाच्या दुर्दम्य आशावादाने राजवीरच्या जखमा भरणार का? की त्याच्यातील कडवटपणामुळे पुष्पाचा निर्धार डळमळीत होणार? विचारसरणीमधील हा संघर्ष बघण्यासाठी आणि त्या दोघांना बदलून टाकण्याची शक्यता असलेल्या एका नात्याची सुरुवात बघण्यासाठी मालिका बघत रहा.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना गौरव चोप्रा म्हणतो, “मी जेव्हा ही पटकथा पहिल्यांदा वाचली, तेव्हा राजवीरच्या स्वभावातील गुंतागुंत मला आकर्षक वाटली. तो असा माणूस आहे, जो अत्यंत हुशार पण आतून कोसळलेला आहे, चाणाक्ष पण हताश आहे आणि परिस्थितीमुळे विक्षिप्तपणा आला असला तरी तो एक संवेदनशील माणूस आहे. त्याचा प्रवास वेदनामय पण खराखुरा वाटणारा आहे. आपल्या सगळ्यांनाच जखमा असतात, काही दिसतात तर काही लपवलेल्या असतात. एक अभिनेता म्हणून, मला आव्हान देणाऱ्या भूमिका आवडतात. एक एक पदर उलगडून त्यातील मानवी भावनांचा शोध घ्यायला मला आवडते. राजवीर शास्त्री ही अशीच व्यक्तिरेखा आहे. आणि, करुणा पांडे सोबत काम करत असल्यामुळे हा अनुभव आणखीनच सार्थकता देणारा आहे. तिने पुष्पा इतक्या सहजतेने आणि प्रामाणिकपणे उभी केली आहे. तिच्या ऊर्जेमुळे प्रत्येक दृश्य चमकदार होते. इतकी दमदार भूमिका करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी निर्मात्यांचा आभारी आहे. प्रेक्षकांना हे नवीन कथानक बघायला नक्की आवडेल, त्यात भावनिक चढ-उतार बघायला मिळती.”