
no images were found
ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकासाठी सेल्फ आणि कॅम्प अशा दोन पद्धतीने नोंदणी अभियान राबवा -जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : प्रत्येक गावात ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली नाही, त्यांना याची माहिती मिळावी म्हणून, उर्वरित नावांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध केल्या जातील. तसेच ‘सेल्फ’ (स्वतःहून) आणि ‘कॅम्प’ (शिबिराद्वारे) या दोन पद्धतीने नोंदणी अभियान राबवून ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा सक्रिय करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. यादरम्यान जनजागृती मोहीम हाती घेऊन, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंधर पांगारे, तसेच तालुकास्तरावरून सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रीस्टॅक ही केंद्र आणि राज्य शासनाद्वारे सुरू केलेली एक डिजिटल ओळख क्रमांक योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक खास ओळख क्रमांक दिला जातो, ज्याद्वारे ते विविध शासकीय योजना व लाभ सहजपणे प्राप्त करू शकतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ग्रामस्तरावर जनजागृती मोहीम राबवावी. गावातील सर्व व्हॉट्सॲप गटांवर याद्या प्रसिद्ध कराव्यात. प्रसिद्धीसाठी मिळालेल्या निधीतून जनजागृती करावी. ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, कृषी सहायक यांनी गावातील सर्व यंत्रणांचा वापर करून कॅम्पचे आयोजन करावे. तसेच शेतकऱ्यांनाही स्वतःहून नोंदणी करण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेतील ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक क्रमांक घेतला आहे. त्यामुळे याचे ५७ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री किसान योजनेतील जे अक्रियाशील (इनॲक्टीव्ह) शेतकरी आहेत, त्या पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक क्रमांक महत्त्वाचा व आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, मृत शेतकरी आढळल्यास त्यांच्या वारसांची नोंदणी करावी. प्रधानमंत्री किसान योजनेतील उर्वरित १.३४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी दहा दिवसांत पूर्ण करावी. तसेच कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांपैकी ४ लाख ६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. येत्या १५ दिवसांत ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिले.