
no images were found
13 वर्षांनंतर राजेश जैस यांचे टेलिव्हिजनवर पुनरागमन
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक कथानक आणि प्रभावी पात्रांमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. अलीकडेच आपण पाहिले की अविनाश (ईशांक सल्लूजा) आणि दिव्या (शुभांशी रघुवंशी) लग्नाची योजना आखत होते. मात्र, जुन्या भावना आणि न सुटलेली व्यथा पुन्हा वर आल्याने आगामी भागांमध्ये चंद्रिका (नौशीन अली सरदार) आपला मुलगा अविनाशचे लग्न करिश्मा (प्रतिक्षा राय) सोबत लावण्याची तयारी करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे देवांश (अभिषेक शर्मा) करिश्माचा खरा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या साऱ्या नाट्यमय घडामोडींच्या दरम्यान या कथेत नुकतीच भर पडली आहे एका अनुभवी कलाकाराची — राजेश जैस, जे त्यांच्या प्रभावशाली अभिनयशैली आणि बारकाईने साकारलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात.
राजेश जैस ‘वसुधा’मध्ये सूर्यसिंह राठोड ही भूमिका साकारत आहेत — हे एक असे पात्र आहे जे कथेत अधिक भावनिक खोली घेऊन येते. सूर्या हा गावातील एक सरळ, तत्त्वनिष्ठ आणि नैतिकतेला सर्वोच्च मानणारा माणूस आहे आणि त्याचे संपूर्ण विश्व त्याची मुलगी दिव्या हिच्याभोवती फिरते. काही वर्षांपूर्वी त्याचे चंद्रिका आणि प्रभात यांच्याशी अतूट नाते होते, पण त्यांच्या उदयपूरला जाण्यानंतर आयुष्यात कटू वळण आले आणि सूर्याचे मन कठोर झाले. म्हणूनच जेव्हा वसुधा (प्रिया ठाकूर) दिव्या आणि अविनाशच्या विवाहासाठी सूर्याला समजावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती एक अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची प्रक्रिया ठरते.
सूर्या हे खरोखरच एक ताकदवान आणि तत्त्वनिष्ठ पात्र आहे जे ‘वसुधा‘मध्ये निश्चितच एक नवीन आणि तीव्र वळण आणणार आहे. आणि राजेश जैससारख्या कलाकारासाठी सूर्यासारखी पात्रेच अभिनयाला एक अर्थपूर्ण आणि सर्जनशील समाधान देणारा प्रवास बनवतात!
राजेश जैस म्हणाले, “सुमारे 13 वर्षांनंतर पुन्हा टेलिव्हिजनवर परतणे ही एक अत्यंत समाधानदायक अनुभूती ठरली आहे. मी नेहमीच अरविंद बब्बल यांच्या कथा मांडण्याच्या शिस्तबद्ध पद्धतीचा चाहता राहिलो आहे—त्यांच्यासोबत मी यापूर्वी एक चित्रपट आणि एक मालिका केली होती. त्यामुळे जेव्हा मला ‘वसुधा’मध्ये सूर्यसिंह राठोड ही भूमिका देण्यात आली तेव्हा ती एक परफेक्ट संधी वाटली. सूर्या केवळ एक वडील नाही—तो निष्ठा, दुःख आणि खोलवर रुजलेल्या मूल्यांनी घडलेला माणूस आहे. अशा व्यक्तीची भूमिका साकारताना जी भावनिक गुंतवणूक करावी लागते ती आव्हानात्मक आणि समाधानदायक आहे. अशाच भूमिका खऱ्या अर्थाने कलाकाराला हव्या असतात.”
त्यांनी पुढे सांगितले, “जयपूरजवळील सामोदमध्ये आउटडोअर शूटिंग करताना नवीन चैतन्य लाभले आणि नव्या लूक व व्यक्तिरेखेत शिरताना मी खूप एन्जॉय केले. शेवटच्या काही भागांचे शूटिंग पाहताना मला माझ्या सुरुवातीच्या टीव्ही दिवसांची आठवण झाली — एक अनोखा आनंद आणि समाधान मिळाले. संपूर्ण क्रिएटिव्ह टीमने वेळेच्या मर्यादेत इतकी बारकाईने कथा मांडली, त्यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक. ‘वसुधा’चे कलाकार आणि दिग्दर्शन टीम लक्ष केंद्रीत करुन अचूक आणि प्रचंड उत्साहाने अगदी कमांडोंसारखे काम करतात. त्यांच्या समर्पणाला सलाम!”
राजेश ‘वसुधा’मध्ये आपला वेळ मनापासून एन्जॉय करत असताना प्रेक्षकांसाठी हे पाहणे खरंच रंजक ठरेल की सूर्या त्याची मुलगी ज्याच्यावर प्रेम करते – त्या अविनाशला स्वीकारेल का कारण अविनाश त्याच लोकांचा मुलगा आहे ज्यांनी कधीकाळी त्याचा विश्वास मोडला होता? वसुधा सूर्याला मनवू शकेल का? पुढे काय घडेल?