
no images were found
दशावतराचा खेळ आणि गाऱ्हाणं घालून कलाकारांनी केला मालिकेचा शुभारंभ
‘बा लक्ष्मीनारायणा आणि रवळनाथा तू मागणं घेण्यास राजी हस तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा…तर देवा महाराजा आमच्या नव्या मालिकेसाठी आणि प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आम्ही कलाकारांनी जो काय घाट घातलेला हा, जी काय मेहनत घेतलेली असा ती मेहनत फळाक येवोन सगळ्यांच्या पसंतीस उतरान दे रे म्हाराजा.’ लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी घातलेल्या गाऱ्हाण्याचा नाद संपूर्ण वालावल नगरीत दुमदुमला. निमित्त होतं ते कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या लॉन्च सोहळ्याचं. या मालिकेचं बरचसं शूटिंग कोकणातल्या कुडाळमध्ये होणार आहे. वालावल मंदिर, निवतीचा समुद्र किनारा अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली बरीचशी प्रेक्षणीय स्थळं मालिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेची गोष्ट कोकणात घडत असल्यामुळे शूटिंगचा श्रीगणेशा आणि लॉन्चिंग सोहळा देखिल या देवभूमीत करण्यात आला. याप्रसंगी सुकन्या कुलकर्णी, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, अमृता माळवदकर, अमित खेडेकर, संजय शेजवळ आणि स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे उपस्थित होते.
अलोट जनसमुदायाच्या साक्षीने वालावल मंदिरात लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोकण म्हण्टलं की आपसुकच डोळ्यासमोर येतो तो दशावताराचा खेळ. त्यामुळेच कोण होतीस तू, काय झालीस तू च्या लॉन्च सोहळ्यातील संयुक्त दशावतराच्या खेळाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते या मालिकेतील कावेरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने सादर केलेला लाठीकाठीचा खेळ. दोन महिन्यांपासूनची गिरीजाची ही मेहनत एक वेगळीच ऊर्जा देऊन गेली.
याप्रसंगी सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, ‘मी अतिशय भाराऊन गेली आहे. नाटक आणि सिनेमा पहाण्यासाठी हमखास गर्दी होतेच. पण मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला ३००० पेक्षा जास्त चाहते उपस्थित होते हे पाहून खूप छान वाटलं. कोकणातली माणसं फणसासारखी असतात. वरुन काटेरी मात्र आतून तितकीच गोड. या मालिकेत मी साकारात असलेली सुलक्षणा धर्माधिकारी देखिल अशीच फणसासारखी असणार आहे. आजवर माझं हे रुप प्रेक्षकांनी पाहिलेलं नाहीय. त्यामुळे मला हे पात्र साकारताना मज्जा येतेय.’
या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराची कोकणाशी नाळ जोडलेली आहे. मालिकेच्या कथानकाविषयी देखिल उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू सोमवार २८ एप्रिल पासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.