no images were found
२७ ऑक्टोबरपर्यंत गांधीनगरात मालवाहू वाहनांवर निर्बंध
कोल्हापूर : पोलिसांनी जड आणि मध्यम माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना गांधीनगर मार्केटमध्ये २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत प्रवेशबंदी केली आहे. कोल्हापूरमधील गांधीनगर हे सर्वात मोठे घाऊक व किरकोळ व्यापारी बाजारपेठ असून दिवाळीमध्ये या बाजारात प्रचंड गर्दी असते. अनेक भागातून तसेच विविध राज्यातील व्यापारी माल घेण्यासाठी व जवळपासचे नागरिक दिवाळी खरेदीसाठी गांधीनगर येथे येत असतात.
बाजारपेठमध्ये जाण्यासाठी एकच मोठा रस्ता असून प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. याचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. पादचारी तसेच ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी अवजड, जड व मध्यम मालवाहतूक करणाऱ्या मोटर वाहनांना बाजारपेठेतील प्रवेशास व माल चढउतार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक व प्रशासकीय वाहनांना वगळण्यात आले आहे.
वाहतुकीतील केलेला बदल असा असेल:- १) सकाळी १० ते रात्री १० पर्यंत तनवाणी कॉर्नर ते गांधीनगरकडे मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद २) गणेश टॉकीज ते वळीवडे कॉर्नर मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंदचिंचवाड, वळिवडेत जाण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो, नागरिकांच्या वाहनांना कोयना कॉलनी, सरकारी दवाखानामार्गे वळिवडेत किंवा चिंचवाडमध्ये जाता येईल. ३) ट्रान्स्पोर्ट लाईनच्या अवजड, जड वाहनांना ये-जा करण्यासाठी तावडे हॉटेल, उचगाव फाटा, गडमुडशिंगी, चिंचवाड मार्गे गांधीनगर असा आहे. ४) ट्रान्स्पोर्ट लाईनमधून गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना माल देण्या-घेण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो यातून रात्री १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुभा आहे.