
no images were found
मला राज ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड अडकायला आवडेल – शेलार
महाराष्ट्र : मराठी नववर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी अगदी वेगळ्या ढंगात साजरी केली. “सुशीला- सुजीत” या आगामी चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नववर्षाच्या पूर्व पूर्व संध्येला एकत्र येत, गुढी उभारत, नटून सजून, उत्सवी वातावरणात नववर्षारंभी ईश्वराला साकडे घालत मराठी चित्रपटसृष्टीला येणारे नवीन वर्ष यशाचे, भरभराटीचे आणि नवनवीन प्रयोगांचे जावो असे साकडे घातले. सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांनी चित्रपटाच्या यशासाठी आणि त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
निमित्त होते १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होवू घातलेल्या “सुशीला-सुजीत” चित्रपटाच्या निर्माते आणि कलाकारांनी नुकतेच मंबई मध्ये आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक या यजमानांबरोबर प्रमुख पाहुणे होते राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे व लोकप्रिय कलाकार अंकुश चौधरी, सुव्रत जोशी, प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर, सुशांत शेलार, रिंकु राजगुरू, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे, हे सर्व लोकप्रिय कलाकार आपल्या मित्रांच्या आनंदात सहभागी झाले होते.येणारे मराठी नववर्ष संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला आणि त्यातील प्रत्येकाला आनंदाचे, भरभराटीचे, सुखाचे आणि नवनवीन प्रयोगांचे जावो, असे साकडे देवाकडे यावेळी नववर्षानिमित्त घातले गेले.. मराठी नववर्षाची गुढी दिमाखाने डौलत होती आणि सभोवताल उत्सवी आणि उत्साही वातावरणाने भारून गेला होता.
ढोल-ताशे, सनई, तुतारी यांचे स्वर निनादत होते, समया मंद मंद तेवत होत्या, जमलेले सर्व पारंपारिक मराठमोळ्या पोषखात होते. जेवणाचा बेतही फक्कड मराठी होता. विलेपार्ले , मुंबई येथे नववर्ष पूर्वसंध्येला “सुशीला- सुजीत”तर्फे चैत्र पाडव्याच्या निमित्ताने एक छोटेखानी “स्नेह भोजना”चा हा बेत आखला गेला होता. निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटातील तंत्रज्ञ यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे चेहरे नववर्ष स्वागतासाठी खास जमले होते.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांनी ‘सुशीला-सुजीत’ला भरपूर यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या आणि या चित्रपटाच्या यशाने इतरांना स्फूर्ती मिळेल, असे गौरवोद्गार काढले. “यातील नायक-नायिका नकळतपणे बंद दाराआड अडकले आहेत, पण रसिक प्रेक्षकांनी घरात अडकून न राहता या चित्रपटाला पाठबळ देण्यासाठी बाहेर यावे. चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याचा आनंद तुम्हाला मिळू द्या, तुमचा व्यवसाय चांगला होवू द्या, पण या चित्रपटाच्या यशातून इतर मराठी चित्रपटांसाठी प्रेरणा मिळेल आणि नवनवीन चित्रपट काढण्याची स्फूर्ती इतरांना मिळेल,” ते म्हणाले.
श्री आशिष शेलार यांनी म्हटले की, सांस्कृतिक विभागातर्फे सध्या योजना सुरु आहेत, पण मराठी सिनेमासाठी महाद्वार खुले करायचे आहेच. “मराठी माणूस चित्रपटांचा रसिक आहेच, पण अमराठी प्रेक्षकसुद्धा या चित्रपटाला मिळो, अशा शुभेच्छा मी चित्रपटाला देतो. तुम्ही सर्व आमचे लाडके कलाकार आहात. प्रेक्षक त्यांची सुखदुःखे तुमच्या अभिनयात पाहतो आणि त्यांमध्ये स्वतःच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधतो,” असेही ते म्हणाले.
व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून समारंभाला हजेरी लावल्याबद्दल प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांनी श्री शेलार यांचे आभार मानले. यावेळी श्री शेलार यांना प्रसाद ओक यांनी चित्रपटाच्या कथा संकल्पनेला धरून एक मजेशीर प्रश्न विचारला. “आमच्या चित्रपटात नायक-नायिका बंद दाराआड अडकले आहेत. तसे तुम्ही कधी चुकून कुणाबरोबर अडकलात तर ती व्यक्ती कोण असेल तर तुम्हाला आवडेल? तुम्हाला तीन पर्याय आहेत – उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार!,” प्रसाद ओक विचारतात.
त्यावर आशिष शेलार उत्तर देतात, “या तीन पर्यायांपैकी कोणताच पर्याय नसेल तर मला राज ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड अडकायला आवडेल. त्यांच्याबरोबर आमची नैसर्गिक मैत्री तर आहेच पण ते एक कलाकार आहेत. कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. ज्याच्याबरोबर वाद, संवाद, चर्चा, विमर्श करायला आवडते आणि आनंद मिळतो अशी ती व्यक्ती आहे. बंद दाराआड त्यांच्याबरोबर नकलांपासून अकलेपर्यंत सर्व प्रकारची मेजवानी प्राप्त होईल.”
“चैत्र पाडव्याच्या पूर्व पूर्व संध्येला ‘सुशीला-सुजीत’च्या निमित्ताने आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. माननीय मंत्री श्री आशिष शेलार हे मराठी चित्रपटासाठी झटणारे, आमची दुःख समाजणारे आणि मराठी चित्रपटाला पुढे नेणारे सांस्कृतिक मंत्री आहेत. असा नेता आमच्या ख्यात्याला दिल्याबद्दल सरकारचे आभार,” असे उद्गार श्री प्रसाद ओक यांनी काढले.
स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’चे दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहेत. ओक यांची कथा आहे आणि त्यांनी यात भूमिकाही केली आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्सची ही निर्मिती आहे. सुनील तावडे, रेणुका दफ्तरदार, सुनील गोडबोले हे कलाकारही या चित्रपटात आहेत.