no images were found
‘स्टार्ट अप‘ शिबिरातून अधिकाधिक नवउद्योजक घडावेत –कुलगुरु डॉ. शिर्के
कोल्हापूर : तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योगनिर्मिती करताना अपयश आल्यास खचून न जाता जिद्दीने वाटचाल करुन यशाच्या दिशेने पुढे जावे, असे सांगून प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अशा ‘स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शिवाजी शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा’च्या दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, नवउद्योजक कृष्णराज धनंजय महाडिक, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एम. एस. देशमुख, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता श्रीकृष्ण महाजन, तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन. सपली, रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रकाश राऊत तसेच विभाग प्रमुख, प्राध्यापक, नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणारे नवउद्योजक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकातून सहायक संचालक संजय माळी यांनी स्टार्टअप यात्रा सुरु करण्यामागील उद्देश विशद केला. तसेच उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या नवसंकल्पनांना जिल्हा व राज्यपातळीवर आकर्षक बक्षिस देण्यात येणार असल्याचे सांगितले. आभार डॉ. प्रकाश राऊत यांनी मानले.