
no images were found
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची
– जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. हरळी बुद्रुक (ता.गडहिंग्लज) येथील ३ मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वय कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पातून ११०१ शेतकऱ्यांना शेती करिता दिवसा वीज पुरवठा होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित शेतकरी यांच्यासोबत संवाद साधला व उपस्थित अधिकाऱ्यांना उर्वरित सर्व प्रकल्प गुणवत्तापूर्ण व जलद गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय आडके, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी, सहायक अभियंता संदीप पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी राजेंद्र तोळे, सरपंच निलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, जनमित्र व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरळी बुद्रुक (ता.गडहिंग्लज) हा प्रकल्प ३३/११ केव्ही महागाव उपकेंद्रास जोडण्यात आला आहे. या उपकेंद्रातून निघणाऱ्या महागाव कृषी वाहिनीवरून ६०२, नदीघाट कृषी वाहिनीवरून ८५ व हरळी कृषी वाहिनीवरून ४१४ अशा एकूण ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे तीन कृषी वाहिनीवरील महागाव, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, हुनगिनहाळ, वैरागवाडी, हसुरवाडी, हसूर सासागिरी, या गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.