no images were found
नोटीस देऊनही सुनावणीस अनुपस्थित राहिलेल्या व्यापारी, फर्म यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विशेष कॅम्प
कोल्हापूर: महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील व्यापारी/फर्म यांचे असेसमेंट पुर्ण करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी/फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीसा देऊनही काही व्यापारी/फर्म यांनी आपली कराची रक्कम महापालिकेकडे भरणा केलेली नाही. महानगरपालिकेने नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करुन यापुर्वी नोटीस देऊनही सुनावणीस अनुपस्थित राहिलेल्या व्यापारी/फर्म यांना त्यांची बाजू मांडण्याची अंतिम संधी म्हणून विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. हा कॅम्प सोमवार, दिनांक 17 ते 20 ऑक्टोंबर 2022 अखेर छ.शिवाजी मार्केट, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे.
महापालिकेने व्यापा-यांची बँक खाती तात्पुरती सिल करण्याची कारवाई सुरू केली आहे. याबाबत आयुक्तांचे आदेश संबंधीत बँक अधिकारी व व्यापारी यांना दिले आहेत. स्थानिक संस्था कर भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटीसा देवूनही त्याकडे पाठ फिरविणा-या थकबाकीधारक व्यापा-यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून महापालिकेकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तरी संबंधीत व्यापाऱ्यांनी या विशेष कॅम्पमध्ये सुनावणीस उपस्थित राहावे व आपली कराची रक्कम भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागामार्फत करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये सुनावणीस अनुपस्थित राहतील अशा व्यापारी/फर्म यांना यापुढे कोणतीही संधी न देता नियमातील तरतुदीनुसार करनिर्धारण पुर्ण करण्यात येईल याची संबंधीतांनी नोद घ्यावी.