
no images were found
२९ हजार माथाडी कामगारांच्या हाती ‘कमळ’!
मुंबई : राष्ट्र प्रथम’ ही भावनासमोर ठेवून राष्ट्रहित जोपासणारा पक्ष म्हणजे ‘भारतीय जनता पक्ष’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप-महायुती सरकार कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे राष्ट्राची वाटचाल विकसित भारताकडे होत आहे. देशाचा विकास करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप हे आता देशातील नागरिकांना कळायला लागले आहे त्यामुळे ‘भाजप’मध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षांमधून पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आणि पक्षात प्रवेशाचा ओघ वाढत आहे.
नुकतेच मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात संजय (बापू) निकम आणि पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘माथाडी कामगार युनियन’च्या तब्बल २९ हजार माथाडी कामगारांनी प्रवेश केला. हा पक्षप्रवेश ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘भाजप’चे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘भाजप’मध्ये होणारा पक्षप्रवेश पाहता रविंद्र चव्हाण यांनी भाजप पक्ष वाढ आणि पक्ष विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे या माध्यमातून स्पष्ट होत आहे. या अनुषंगाने चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे नेते संजय (बापू) निकम आणि पोपटराव पाटील यांच्याशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कामगार हित जोपासून त्यांच्या समस्या सोडवू शकतात आणि कामगारांच्या हितासाठी भाजपच आवश्यक आहे, हे त्यांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत.
रविंद्र चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत आणि त्यांच्या मेहनतीचे फलित म्हणून संजय (बापू) निकम आणि पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वात माथाडी कामगार युनियनच्या तब्बल २९ हजार कामगारांनी हाती कमळ घेतले. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.