
no images were found
पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे
शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन
•छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादन
•छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार, डॉ.विनय कोरे
•पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, : सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 जयंती निमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राज्यव्यापी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेच्या अनुषंगाने महाराजांचा सहवास व वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळा गडावर जिल्हा प्रशासनाकडून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देवून, देशभक्ती आणि नेतृत्वाचा प्रचार करणे, सुशासनाबद्दल जागरुकता निर्माण करणे, स्वदेशी भावनेचा प्रचार करणे यासाठी ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहुवाडी पन्हाळा मतदार संघाचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी आयोजित कार्यक्रमात उपस्थितींना छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया असे आवाहन केले. त्यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सारथीच्या सहव्यवस्थापक संचालिका किरण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डॉ.कोरे म्हणाले, संपूर्ण जगासमोर राजा कसा असावा हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे निर्माण झाला. ऐतिहासिक कार्याची आठवण व राष्ट्र उभारणीस प्रेरणादायी उजाळा देण्याची ही वेळ आहे. या पदयात्रेतून शिवरायांच्या पाऊलखुणा असलेला प्रेरणादायी वारसा प्रत्येक घराघरात ऊर्जा देणारा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर पन्हाळा गडावर बांधले असून असंख्य शिवप्रेमी या गडावर येऊन शिवज्योती मशाली नेवून आपापल्या गावात शिवविचार जागृत ठेवण्याचा संकल्प करत असतात. यावेळी त्यांनी एकविसाव्या शतकातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपतींचा इतिहास सांगणाऱ्या थिएटरचे लोकार्पण सोहळा पन्हाळगडावर मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार आहे. चार किलोमीटरच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक त्यांनी केले. एका चांगल्या शिवमय वातावरणात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. महाराजांचा सहवास व वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणार आहे. येथील नैसर्गिक व ऐतिहासिक वास्तू तसेच पावनखिंडीचा, युद्धकलेचा वारसा सांगणारे शिवा काशीद व वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे नैपुण्य जगाने पाहिले आहे. यामुळेच, स्वराज्याच्या प्रवासात सहभागी ऐतिहासिक किल्ल्यावर आपण पदयात्रा काढू शकलो. छत्रपतींचे विचार आचरणात आणूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचेच राजे नव्हते तर संपूर्ण देशाचे राजे होते असे म्हटले.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त विजेते पोलीस हवालदार आयुबखान अकबर मुल्ला यांचा विशेष सत्कार आमदार डॉ.कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमोचे प्रस्ताविक प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केले तर आभार तहसिलदार माधवी शिंदे यांनी मानले.
पारंपरिक युद्धकला, लाठीकाठी, लेझीम आणि पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेदरम्यान कार्यक्रमस्थळी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेतील सहभागी विद्यार्थी, तसेच राजमाता जिजाऊ, मावळे यांच्या वेषभुषेतील तरूण पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. त्यांचे छायाचित्र, सेल्फी घेण्यासाठी इतर सहभागींनी गर्दी केली. याचबरोबर पारंपरिक युद्धकलेचे सादरीकरण पदयात्रेनिमित्त करण्यात आले होते. लेझीम, लाठीकाठी अशा पारंपरिक नृत्य व युद्धकलेचे सादरीकरण कार्यक्रमस्थळी करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर दोन विद्यार्थ्यांनी भाषणेही केली. कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजी महाराजांच्या जीवनातील वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित नाट्य सादर केले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी हजेरी लावत त्यांचे कौतुकही केले.