no images were found
अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी आजपासून पहिला कॅप राऊंड, शनिवारअखेर मुदत
गडहिंग्लज : अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी विकल्प फेरीला (कॅप राऊंड) सुरवात होत आहे. यंदा राज्यात प्रवेशासाठी विक्रमी एक लाख २९ हजार २३४ अर्ज आल्याने प्रवेशासाठी चढाओढ लागण्याची चिन्हे आहेत. परिणामी, विकल्प भरताना विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. विद्यार्थ्यांना शनिवार (ता. १५) अखेर ‘ऑनलाइन’ विकल्प भरण्याची मुदत आहे. मंगळवारी (ता. १८) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी लागणार आहे. राज्यात सुमारे १ लाख ३२ हजार प्रवेश क्षमता आहे.
प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू झाली. चार ऑक्टोबरअखेर अर्जाची मुदत होती. सात ऑक्टोबरला कच्ची, तर बारा ऑक्टोबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर झाली. विद्यार्थी अधिकाधिक ३०० विकल्प भरू शकतात. पहिल्या यादीतील पहिला विकल्प सक्तीचा राहणार आहे. महाविद्यालयातील मूलभूत सुविधा, शिक्षकांचा अनुभव, उपलब्ध प्रयोगशाळा, अध्यापन प्रणाली, ‘नॅक’, ‘एनबीए’ ची मानांकने, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या व सरासरी पॅकेज आदी मुद्द्यांचा अभ्यास करून विकल्प भरावेत, अशी माहिती समुपदेशक प्रा. अजित पाटील यांनी दिली.
अठरा ऑक्टोबरला प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी लागेल. यादीतील विद्यार्थ्यांनी २१ ऑक्टोबरअखेर प्रवेश निश्चित करायवयाचा आहे. दीड महिना प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा प्रवेशप्रक्रियेची एक अधिक फेरी होणार आहे. एकूण तीन रीतसर फेऱ्या होतील. रिक्त जागांसाठी संस्था स्तरावर शेवटची समुदेशन फेरी होईल. राज्यातील सर्वच शासकीय, अनुदानित आणि खासगी २९१ संस्था यासाठी सुविधा केंद्र म्हणून कार्यरत आहेत.
प्रक्रिया व मुदत :- पहिला कॅप राऊंड – १३ ते १५ ऑक्टोबर, पहिली यादी – १८ ऑक्टोबर, दुसरा कॅप राऊंड – २३ ते २६ ऑक्टोबर, दुसरी यादी -२८ ऑक्टोबर, तिसरा कॅप राऊंड – २ ते ४ नोव्हेंबर, तिसरी यादी- ६ नोव्हेंबर रोजी प्रशिद्ध होणार आहे.