
no images were found
निखील लढत असताना प्रशिक्षकावर काळाचा घाला; सुवर्णपदक जिंकले
गांधीनगर : महाराष्ट्राचा बॉक्सर निखील दुबेने गांधीनगर येथे झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत मध्यम वजनीगटात सुवर्ण पदक पटकावले. मात्र या सुवर्णपदकाचा जल्लोष मात्र करण्यात आला नाही. कारण निखीलच्या प्रशिक्षकांचे निखीलचा सामना पाहण्यासाठी येत असताना रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले होते.
निखीलने सुवर्णपदक पटकावल्यानंतर आकाशाकडे पाहिले आणि आपल्या मार्गदर्शकाला धनंजय तिवारींना अभिवादन केले. ज्यावेळी सोमवारी निखीलने क्वार्टर फायनल सामना जिंकला. त्यावेळी त्याने मुंबईत असलेल्या आपल्या मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असलेल्या धनंजय तिवारी यांना फोन केला. निखीलचा पुढचा सामना हा नॅशनल चॅम्पियन सुमित कुंदूसोबत होता.
प्रशिक्षक तिवारी आपल्या पठ्ठ्याला नॅशनल चॅम्पियन असलेल्या बॉक्सरशी कसा दोन हात करतो हे पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी आपली बुलेट काढली आणि मुंबईहून गांधीनगरच्या दिशेने निघाले. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचा अपघात झाला. इकडे निखीलने 75 किलो वजनीगटातील आपला सामना जिंकला होता. मात्र तोपर्यंत प्रशिक्षक तिवारींनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, निखीलने अंतिम फेरी देखील जिंकली आणि त्याच्या गळ्यात सुवर्णपदक चमकू लागले. मात्र निखील या पदकाचे सिलेब्रेशन करू शकला नाही.
याबाबत भावुक झालेला निखील म्हणला की, ‘माझ्या प्रशिक्षकांच स्वप्न होतं की मी कुंदूविरूद्धचा सामना जिंकावा आणि सुवर्णपदकाचा सामना खेळावा. मी सोमवारी त्यांच्याशी बोललो त्यावेळी मी त्यांना माझा सामना कुंदूशी होणार असल्याचे सांगितले. ते खुप उत्साहित झाले आणि ते माझा सामना पाहण्यासाठी त्यांच्या बुलेटला किक मारून निघाले. त्यांनी मला सांगितले होते की माझ्यात कुंदूला पराभूत करण्याची क्षमता आहे.’ निखील दुबने आपल्या प्रशिक्षकांना दिलेले वचन पाळले. त्याने मिझोरमच्या मलसावमटलुआंगाचा 5 – 0 असा पराभव करत बुधवारी सुवर्ण पदक जिंकले.
१३ बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर सापळ्यात बंद
भंडारा : तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी ‘सीटी १’ या वाघाने वाघाला सापळ्यात अडकवण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. मागील तीन महिन्यांपासून या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते.
‘सीटी १’ या वाघाने १३ लोकांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक दहशतीखाली वावरत होते. दोन दिवसांपूर्वी देसाईगंज जवळच्या एका गाईवर या वाघाने हल्ला केला. त्यामुळे तेथेच वनविभागाची टीम पाळत ठेवून होती.
गुरुवारी सकाळी ताडोबा येथील टीमने या वाघाला सापळ्यात अडकवला. त्याच्यावर बेशुद्धीचं इंजेक्शन डागण्यात आलं. १३ जणांचा बळी घेतल्यानंतर हा वाघ पकडण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या वाघाला गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा येथे जेरबंद करण्यात आलेलं आहे.
मराठा आंदोलना बाबत चंद्रकांत पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल, राजीनामा देण्याची मागणी
मुंबई : ज्येष्ठ भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख असणारी कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन व्यक्तींमधील अर्ध्या तासाच हे संभाषण व्हायरल होत असून त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चातील नेत्यांना पैसे देऊन फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तथापि चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मग फूट पाडण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने हा मुद्दा लावून धरत चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. चंद्रकांतदादा मराठा आहेत याची काय व्हॅलेडिटी आहे? असा प्रश्नही मराठा क्रांती मोर्चाने उपस्थित केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील माहिती समाजाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पुढे बोलताना केदार म्हणाले की, समाजाला हरवण्याची ताकद कुण्या ऐऱ्यागैऱ्या सदावर्तेंमध्ये नव्हती. पण आमचेचं काही लोक फुटीर निघाले आणि सरकारने काही लोकांना फोडलं म्हणून मराठा समाजाला त्यावेळी आरक्षण मिळालं नाही. काही जणांनी आम्हाला टेबलावर हरवलं, असंही योगेश केदार म्हणालेत. चंद्रकांत पाटलांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरून देखील हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही केदार यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी या व्हायरल क्लिपची निष्पक्ष पडताळणी व्हावी अशी मागणी केदार यांनी केली आहे.
माता नव्हे वैरीण ! पाण्याच्या टाकीत टाकून घेतला चिमुकल्याचा जीव
टाकळघाट : येथील शिक्षक कॉलनीत भाड्याने राहणाऱ्या कुटुंबातील चिमुकल्याला त्याच्या जन्मदात्या आईनेच घरावरील पाण्याच्या टाकीत टाकून जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. चिमुकल्याचे नाव सारांश पंजाब पाटेकर असून त्याचे वय अवघे अकरा महिने इतके आहे. त्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आई एकता पंजाब पाटेकर(वय२७)हिला अटक केली आहे .
टाकळघाट येथील मनोहर भेंडे यांच्याघरी पंजाब पाटेकर हे आपल्या कुटुंबासह गेल्या चारपाच महिन्यांपासून भाड्याने राहतात. चिमुकल्याचे वडील इंडोरामा कंपनीमध्ये कामाला आहेत. आई गृहिणी आहे. तीन वर्षापूवी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्या पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा, तसेच परिस्थिती नाजूक असल्याने खर्च वाढत होता. नेहमीप्रमाणे तिने चिमुकल्याला पाळण्यामध्ये झोपवून घरची धुणी-भांडी करीत होती. त्याचवेळी चिमुकल्याचे वडील बेडवर झोपून होते.
धुणी-भांडी आटोपून खोलीमध्ये येऊन बघताच चिमुकला पाळण्यात न दिसल्याने तिने आरडाओरड केली. त्याच्या वडिलाला झोपेतून उठवून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने शोध घेतला. दुसऱ्या माळावर असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये चिमुकला दिसून आल्याने खळबळ उडाली. चिमुकल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताच डॉक्टरांनी रेफर केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड, पोलिस निरीक्षक अशोक कोळी, इकबाल शेख, प्रफुल राठोड आदींनी तपासाची चक्र फिरवीत चिमुकल्याच्या आई-वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेवून खाकीचा दणका दाखविला. चिमुकल्याच्या आईनेच त्याला पाण्याच्या टॅंकमध्ये टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे.
आलमट्टी’ उंचीप्रश्नीा तीव्र विरोधाचा निर्धार: प्रसंगी दहा नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर बंद
सांगली : कर्नाटक मधील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कर्नाटक शासनाला विरोध करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्धार सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’ कार्यालयातील बैठकीसाठी महापूर नियंत्रण समितीचे कार्यकर्ते, जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते. शासनाने या प्रश्नीि सकारात्मक कृती न केल्यास येत्या १० नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर जिल्हा बंद ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला.
या वेळी केंगार म्हणाले, ‘‘आलमट्टी धरणाच्या फुगीमुळे सांगली-कोल्हापूरला महापुराचा धोका होतो, हे पुराव्यासह सिद्ध झाले आहे. यातील बारकावे व तांत्रिक माहिती सादर करताना हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. भलेही ‘जलसंपदा’चे अधिकारी वेगवेगळे दावे करीत असले, तरी ते खासगीत वेगळीच माहिती देतात.
निवृत्त जलसंपदा अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रमोद माने, उत्तमराव माने यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक हणमंत पवार, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, रिपब्लिकन पक्षाचे किरणराज कांबळे, मराठा सेवा संघाचे संजय पाटील, भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक ज्योती आदाटे, काँग्रेसचे नगरसेवक उत्तम साखळकर, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, व्यापारी संघटनेचे समीर शहा, मार्क्सवादी कम्युनिस्टा पक्षाचे उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी आजपासून पहिला कॅप राऊंड, शनिवारअखेर मुदत,
गडहिंग्लज : अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी विकल्प फेरीला (कॅप राऊंड) सुरवात होत आहे. यंदा राज्यात प्रवेशासाठी विक्रमी एक लाख २९ हजार २३४ अर्ज आल्याने प्रवेशासाठी चढाओढ लागण्याची चिन्हे आहेत. परिणामी, विकल्प भरताना विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. विद्यार्थ्यांना शनिवार (ता. १५) अखेर ‘ऑनलाइन’ विकल्प भरण्याची मुदत आहे. मंगळवारी (ता. १८) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी लागणार आहे. राज्यात सुमारे १ लाख ३२ हजार प्रवेश क्षमता आहे.
प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू झाली. चार ऑक्टोबरअखेर अर्जाची मुदत होती. सात ऑक्टोबरला कच्ची, तर बारा ऑक्टोबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर झाली. विद्यार्थी अधिकाधिक ३०० विकल्प भरू शकतात. पहिल्या यादीतील पहिला विकल्प सक्तीचा राहणार आहे. महाविद्यालयातील मूलभूत सुविधा, शिक्षकांचा अनुभव, उपलब्ध प्रयोगशाळा, अध्यापन प्रणाली, ‘नॅक’, ‘एनबीए’ ची मानांकने, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या व सरासरी पॅकेज आदी मुद्द्यांचा अभ्यास करून विकल्प भरावेत, अशी माहिती समुपदेशक प्रा. अजित पाटील यांनी दिली.
अठरा ऑक्टोबरला प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी लागेल. यादीतील विद्यार्थ्यांनी २१ ऑक्टोबरअखेर प्रवेश निश्चित करायवयाचा आहे. दीड महिना प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा प्रवेशप्रक्रियेची एक अधिक फेरी होणार आहे. एकूण तीन रीतसर फेऱ्या होतील. रिक्त जागांसाठी संस्था स्तरावर शेवटची समुदेशन फेरी होईल. राज्यातील सर्वच शासकीय, अनुदानित आणि खासगी २९१ संस्था यासाठी सुविधा केंद्र म्हणून कार्यरत आहेत.
प्रक्रिया व मुदत :- पहिला कॅप राऊंड – १३ ते १५ ऑक्टोबर, पहिली यादी – १८ ऑक्टोबर, दुसरा कॅप राऊंड – २३ ते २६ ऑक्टोबर, दुसरी यादी -२८ ऑक्टोबर, तिसरा कॅप राऊंड – २ ते ४ नोव्हेंबर, तिसरी यादी- ६ नोव्हेंबर रोजी प्रशिद्ध होणार आहे.
शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक; अंतिम मतदार यादी जाहीर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 36 हजार 343 उमेदवार पात्र ठरले आहेत. 14 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 16 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 36 हजार 343 उमेदवार पात्र ठरले आहेत. प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन शिक्षक यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 49 हजार पदवीधरांकडून नोंदणी करण्यात आली होती. त्यामधील 36 हजार 343 पदवीधरांची नावे मतदार म्हणून निश्चिीत करण्यात आली आहेत. ही संपूर्ण यादी विद्यापीठ वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध आहे.
शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी 14 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 16 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल. चालू अधिसभेची मुदत संपून दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर यासाठी मतदान करतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात.
अधिसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने विद्यापीठ विकास मंच व विद्यापीठ विकास आघाडी यांच्यातील जागावाटपाकडे लक्ष लागले आहे.