
no images were found
महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी घेणार इसरोकडे (ISRO) गगनभरारी
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या 58 शाळा असून या शाळांमधून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी पाचवी शासकीय शिष्यवृत्तीमध्ये उज्वल यश संपादन करीत आहेत. सध्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जवळपास दहा हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 56 विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे. यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या 21 विद्यार्थ्यांची बंगळूर येथील इसरोला (ISRO) भेट घडवून आणली जाणार आहे. त्यांच्यासोबत दोन शिक्षिका, एक जबाबदार अधिकारी व एक महिला डॉक्टर असणार आहेत. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या संकल्पनेद्वारे ही भेट इसरोला (ISRO) घडवून आणली जाणार आहे. हि भेट दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2025 या दिवशी ही होणार आहे. याकरिता जाताना एक वेळचा विमान प्रवास व परतीचा रेल्वेने प्रवास करण्यात येणार आहे. तसेच बंगळुर येथे पर्यटन बसद्वारे केले जाणार आहे.
यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात डंका वाजवणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याकरिता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य व जिल्हा स्तरावर यश संपादन केलेल्या 21 विद्यार्थ्यांना इसरो (ISRO) चे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पीन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळवून देणार आहे. इंस्ट्रक्ट या ठिकाणी ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये सॅटेलाईट कडून येणारे मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात. इथून सॅटेलाईट पर्यंत कमांड कशा जातात. इस्रोचे एखाद्या लेटेस्ट ऑपरेशन सुरू असेल तर त्याविषयीही लाईव्ह माहिती पाहायला मिळणार आहे. सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन तसेच भारतीय बनावटीचे मॉडेल्स त्याबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियममध्ये थ्रीडी शो प्लेनोटेरियम पहावयास मिळणार आहे. इथून पुढेही महानगरपालिकेमार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी असे विशेष उपक्रम राबवले जाणार असलेची माहिती उप आयुक्त साधना पाटील यांनी दिली.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची प्रेरणा व मार्गदर्शन तसेच महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर या गोष्टी घडून येत आहेत. इथून पुढेही महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी घवघवीत यश मिळवतील आणि त्यांना एक प्रेरणा मिळेल यासाठी हा उपक्रम सुरू आहे. पालकांनीही आपल्या मुलांना नजिकच्या महानगरपालिका शाळेमध्ये प्रवेश घेऊन विविध संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी केले आहे.
“तयारी स्पर्धा परीक्षांची”
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने “तयारी स्पर्धा परीक्षांची” हा उपक्रम सध्या जोमाने सुरू आहे. यामध्ये विद्यार्थी आठवड्याला दिलेला अभ्यास करून स्पर्धा परीक्षांच्या धरतीवरील परीक्षा देऊन यश संपादन करीत आहेत. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी प्राथमिक स्तरापासूनच व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर परीक्षांचे आयोजन केले जात आहे.