
no images were found
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्याला 37 हजार 314 नवीन घरकुले मिळणार
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 साठी आज नव्याने अतिरिक्त 37 हजार 314 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब गरजू नागरिकांना मोठ्या संख्येने हक्काचं घर मिळणार असून याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यापूर्वी चालू वर्षासाठी 7 हजार 352 चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येकाला हक्काचं घर हा संकल्प यातून नक्कीच साध्य होईल असे ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यात या अगोदर मागील पाच वर्षांत दहा हजार ते पंधरा हजार अशा पद्धतीने घरकुलाचे उद्दिष्ट मिळायचे. मात्र आता एकदम 37 हजार 314 असे एकत्रित घरकुलांसाठी उद्दिष्ट मिळाले आहे.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, मंजुरी देण्यापूर्वी प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांची निवड करताना अपात्र होणाऱ्या लाभार्थींना लाभ दिला जाणार नाही याची दक्षता घ्या. खऱ्या अर्थाने गरजूंना लाभ मिळावा व एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेऊन दिलेल्या वेळेत जिल्हा परिषदेने सर्व 37 हजार 314 घरकुलांना मंजुरी द्यावी. 3 फेब्रुवारी रोजी सर्व तालुक्यांची एकाच दिवशी वन क्लिक द्वारे मंजुरी देण्यात येणार असल्याने याबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर गतीने व पारदर्शक काम करावे. या प्रक्रियेत कोणत्याही लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास किंवा मदत हवी असल्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडे संपर्क साधावा. तसेच गट विकास अधिकारी यांनीही स्थानिक आमदार यांच्याशी संपर्क साधून मंजूर यादी जिल्हा परिषद स्तरावर पाठवावी.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना आवास प्लस ड मध्ये 77 हजार 484 परमनंट वेटिंग लिस्ट आहे. या यादीचे 100% ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करणारा कोल्हापूर राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. या यादी करिता टप्पा एक मध्ये यापैकी सन 2021-22 मध्ये प्राप्त 4558 उद्दिष्टाला 100% मंजुरी देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन सन 24-25 मध्ये ऑक्टोंबर 2024 मध्ये 7 हजार 352 उद्दिष्ट प्राप्त आहे. त्यापैकी 7329 (99.7% राज्यामध्ये दुसरा क्रमांक आहे) लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आले आहे. त्यापैकी 5971 (82%) लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.27 जानेवारी 25 रोजी अतिरिक्त उद्दिष्ट म्हणून ऑनलाइन प्रणालीवर प्रधानमंत्री आवास योजने मधून कोल्हापूर जिल्ह्याला 37 हजार 314 इतके भरघोस उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. म्हणजेच चालू आर्थिक वर्ष 2024 -25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 44 हजार 666 घरकुलाचे उद्दिष्ट मिळाले आहे