
no images were found
झूम प्रकल्पावरील लागलेल्या आगीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर(प्रतिनिधी): – झूम प्रकल्पावर गेले दोन तीन दिवस आग लागून ती धुमसत होती. कालपासून अष्टेकर नगरच्या बाजूला आगीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन फायर फायटर व दोन पाण्याच्या टँकरद्वारे आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. याठिकाणी आज दुपारी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. शनिवारी प्रशासकांनी या ठिकाणी 2 फायर फायटरसाठी खाजगी टँकर वार्षिक मंजूर ठेकेदाराकडून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज सकाळी या ठिकाणी ठेकेदाराकडून खाजगी 10 टँकर उपलब्ध करून घेण्यात आले आहेत या ठिकाणी आग विझवण्यासाठी महापालिकेचे 4 व खाजगी 2 अशा 6 टँकरद्वारे 2 फायर फायटरला दिवसभर पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे सदरचे आग सायंकाळी 6 वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आले आहे. सदरची आग जरी विझवली असली तरी पुन्हा आग लागू नये यासाठी कचऱ्यावर पाणी मारण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे.
या ठिकाणी फिरती करताना प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन या ठिकाणी कंपाउंडवर सुरू असलेल्या पत्र्याच्या आडोशाचे काम जे सुरू आहे ते अष्टेकर नगर या ठिकाणी तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच झूम प्रकल्पा बाहेरील रस्त्यावर पडलेला कचरा उठाव करून आत प्रक्रियेसाठी पाठवावा. या ठिकाणी ऑटो टिपर येताना रस्त्यामध्ये कुठेही कचरा पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मटन मार्केट मधील कचरा त्या ठिकाणी उघड्यावर न टाकता विंडो शेडमध्ये प्रक्रिया करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दिल्या. तसेच या परिसरातील रस्त्यावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. या आगीच्या नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाचे 12 जवान व आरोग्य विभागाचे 8 कर्मचाऱ्यामार्फत पाणी मारण्याचे काम सुरू आहे.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, उप- शहर अभियंता रमेश कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार उपस्थित होते.