
no images were found
“तेनालीच्या भूमिकेने मला शांत राहून, सर्जनशीलतेने आव्हानांचा सामना करायला शिकवले”- कृष्ण भारद्वाज
सोनी सबवरील तेनाली रामा मालिकेत एका महान दरबारी प्रज्ञावंताचा लक्षणीय प्रवास उलगडला आहे आणि त्यातून आपली प्रतिष्ठा गमावून बसलेल्या एका नायकाचा उदय दाखवला आहे. महान तेनाली रामाच्या भूमिकेत अभिनेता कृष्ण भारद्वाज कथानकात मोहकता, वाक्चातुर्य आणि रोमांच घेऊन आला आहे. सध्या सुरू असलेल्या कथानकात तेनाली रामा विजयनगरमध्ये वेषांतर करून वावरत आहे आणि कृष्णदेवराय राजाला दिलेल्या वचनाशी झुंजत असताना आपल्या प्रिय साम्राज्याच्या संरक्षणासाठी धडपड करताना दिसत आहे. नवीन आव्हाने आणि प्रतिकूलतांना तोंड देताना त्याची हुशारी आणि निष्ठा यांची कसोटी होणार आहे.
कृष्ण भारद्वाजशी केलेल्या मनमोकळ्या गप्पांमध्ये त्याने तेनालीचा प्रवास, ही महान व्यक्तिरेखा साकारण्यातील रोमांच आणि प्रेक्षक पुढे काय बघणार आहेत याविषयी सांगितले.
- तेनाली रामाच्या तुझ्या भूमिकेबद्दल तुला जे प्रेम आणि कौतुक मिळत आहे, त्याबद्दल तुला काय वाटते? कोण्या चाहत्याची एखादी संस्मरणीय आठवण?
चार वर्षांपूर्वी मी तेनालीची भूमिका केली होती. आता ही मालिका परतली आहे, तर प्रेक्षकांचे प्रेम वाढतेच आहे, हे पाहून मला कृतज्ञता वाटते. एक संस्मरणीय आठवण म्हणजे, शूटिंग सुरू असताना एक तरुण फॅन तेनाली रामाच्याच पोशाखात मला भेटायला आला. त्याने मालिकेतला एक मजेदार संवाद देखील अचूक बोलून दाखवला. मी जे करत आहे, ते का करत आहे, याचे उत्तर मला अशा क्षणांमधून मिळते. मला हे बघून आनंद वाटतो की, इतक्या लोकांना ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटते.
- तेनाली रामाची भूमिका करत असल्यामुळे प्रत्यक्ष जीवनात तुझ्या दृष्टिकोनात किंवा समस्या हातळण्याच्या पद्धतीत काही फरक पडला आहे का?
अर्थात! तेनालीने मला शांत राहून, सर्जनशीलतेने आव्हानांचा सामना करायला शिकवले. मी बऱ्याचदा विचार करतो, “या परिस्थितीत तेनालीने काय केले असते?” एकदा सेटवर असताना निर्मिती संबंधी काहीतरी अडचण आली होती आणि त्यावेळी मी एक झटपट आणि विचित्र उपाय सुचवला! त्यावर सगळ्या टीमने गंमतीने म्हटले देखील की तेनाली माझ्या प्रत्यक्ष जीवनात उतरू लागला आहे!
- तुझ्या मते, तेनालीच्या व्यक्तिरेखेतून लोकांनी शिकवण घ्यावी असा सर्वात मोठा गुण कोणता आहे?
दबावाच्या परिस्थितीत देखील शांत राहण्याची जी तेनालीची क्षमता आहे, ती प्रत्येकाने स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी तेनाली त्यामुळे गोंधळून जात नाही. उलट, आपले बुद्धीचातुर्य आणि सहानुभूती या गुणांच्या बळावर तो त्यावर उपाय शोधतो. बुद्धिमत्ता आणि कनवाळू मन यांचा संयोग झाल्यामुळे किती आश्चर्यकारक परिणाम मिळतात याची प्रचिती आपल्याला येते.
- हे महान व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारताना आलेली सर्वातमोठी अडचण कोणती होती?
तेनाली रामाची भूमिका करण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान आहे, पण त्यात आव्हानेही आहेत. ऐतिहासिक तथ्यांशी प्रामाणिक राहून तेनालीची हुशारी आणि विनोदबुद्धी यांचा समतोल साधणे फार अवघड होते. आजच्या जगाशी त्याला सुसंबद्ध दाखवणे आणि या महान व्यक्तिमत्त्वाच्या वारशाचा आदर करणे यामध्ये किंचितच फरक आहे. या आव्हानामुळे मला एक अभिनेता म्हणून माझ्या कक्षा रुंदावण्याची स्फूर्ती मिळते.
- तेनाली रामाच्या व्यक्तिरेखेतील विनोद हा या मालिकेचा एक लक्षणीय पैलू आहे. कॉमिक टायमिंग आणि प्रामाणिकता दाखवण्यासाठी तू कोणत्या टेकनिक्स वापरतो?
कॉमिक टायमिंग हे लय आणि सह-कलाकारांनी दिलेल्या क्यू मुळे साधते. मी स्वतःला तेनाली रामाच्या जागी कल्पून स्वाभाविक राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी, दृश्याच्या संदर्भात विनोद अस्थानी वाटू नये, यासाठी दिग्दर्शकांशी बोलतो. कधीकधी, सेटवरील मंडळींच्या समोर मी पंच-लाइन्सची तालिम करतो. त्यांच्या प्रतिक्रियेवरून मला परिणामकारतेचा अंदाज घेता येतो.
- तथाचार्यांशी तुझेपडद्याच्या मागे कसे नाते आहे आणि त्यामुळे तुमच्या पडद्यावरील केमिस्ट्रीवर काय परिणाम होतो?
पडद्याच्या मागे आमचे नाते खूप छान आहे. आमच्यात सतत थट्टा-मस्करी चालू असते. या नात्यामुळे तेनाली आणि तथाचार्य यांच्यातील प्रेम-द्वेषाचे नाते साकारणे सोपे होते. कधीकधी शूटिंगमध्ये आयत्या वेळी आम्ही काही संवाद उत्स्फूर्तपणे टाकतो आणि बऱ्याचदा असे उत्स्फूर्त क्षण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात.
- सेटवर तुला कोणासोबतकाम करताना सगळ्यात जास्त मजा येते आणि का?
एकाच व्यक्तीची निवड करणे अवघड आहे, कारण सर्वच कलाकार जणू एका कुटुंबाचा भाग आहेत. पण एकच नाव घ्यायचे झाले तर मी पंकज बेरी यांचे नाव घेईन. सेटवरची त्यांची ऊर्जा सगळ्यांना चेतवणारी असते. मधल्या विश्रांतीत आमच्यात खूप हास्य-विनोद होत असतात. वातावरण हलकेफुलके ठेवणारी माणसे आसपास असली की वातावरण प्रफुल्लित राहते; विशेषतः ज्या दिवसांमध्ये दीर्घ काळ शूटिंग चालते, तेव्हा!
- तुझ्या व्यक्तिरेखेचा पुढचा प्रवास कसा असणार आहे याची कल्पना देशील का? आगामी भागांत कथानक कसे वळण घेणार आहे?
मी जास्त सांगू शकणार नाही, पण हे नक्की की तेनाली रामाच्या बुद्धीचातुर्याची आता खरी कसोटी होणार आहे. संकट मोठे आहे आणि व्यक्तिगत आव्हाने आहेत. प्रेक्षकांना काही हृदयस्पर्शी क्षण, हुशारीने शोधलेले उपाय आणि काही अनपेक्षित ट्विस्ट बघायला मिळतील. ही व्यक्तिरेखा आणि कथानकातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.