no images were found
डॉ. कलाम यांच्या जन्मदिनी ‘भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा करा
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी
कोल्हापूर : भारताचे माजी राष्ट्रपती व वृत्तपत्र विक्रेत्यांचे आदर्श डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतीय वृत्तपत्र विक्रेत दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस असोसिएशन व महानगर वृत्तपत्र संघटना वतीने या मागणीचे पत्र कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी श्री. कवितके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी राज्य संघटनेचे व विभागीय उपाध्यक्ष श्री दत्तात्रय रघुनाथ कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी किरण व्ह्नगुत्ते, शंकर चेचर, रवी लाड, प्रफुल्ल कोतमिरे, सुरेश ब्राम्ह्पुरे, अंकुश परब, परशुराम सावंत, रवी खोत, सुनील साठे उपस्थित होते. याबाबत माहिती देताना श्री रघुनाथ कांबळे म्हणाले कि, डॉ. कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा भारत सरकार वाचक प्रेरणा दिवस म्हणून संपन्न करते. डॉ. कलाम यांचा पुस्तकांशी घनिष्ठ नाते होते. एक पुस्तक १०० मित्रांच्या बरोबर असते असे त्यांचे विचार आहेत. डॉ. कलाम यांचे वृत्तपत्र व्यवसायाशीही जवळचे नाते आहे. आपल्या शैक्षणिक आयुष्याच्या काळात वृत्तपत्र वाटप करण्याचे काम डॉ. कलाम यांनी केले आहे. अडचणींवर मत करत देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणारे डॉ. कलाम हे आमचे आदर्श आहेत. त्यामुळे ऊन पाऊस थंडी याचा विचार न करता रोज नित्यनेमाने वृत्तपत्रे घरपोच करण्याची वाचक सेवा करणाऱ्या आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांचाही एक दिवस असावा, तो दिवस डॉ. कलाम यांच्या जयंतीदिनी साजरा व्हावा अशी वृत्तपत्रविक्रेत्यांची इच्छा आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांना याबाबतचे निवेदन दिले असून कोल्हापूरचे खासदार संजय मांडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांनाही याबाबतचे निवेदन देणार आहोत. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पोवार व सरचिटणीस विकास सूर्यवंशी, रघुनाथ कांबळे यांच्यासह राज्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्याचे हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत असून जिल्हा पातळीवरही प्रशासनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब व सर्व खासदार यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.