Home संशोधन भूचुंबकत्व क्षेत्रातील संशोधनास आय.आय.जी.चे शिवाजी विद्यापीठास पूर्ण सहकार्य – डॉ. ए.पी. डिमरी 

भूचुंबकत्व क्षेत्रातील संशोधनास आय.आय.जी.चे शिवाजी विद्यापीठास पूर्ण सहकार्य – डॉ. ए.पी. डिमरी 

6 second read
0
0
16

no images were found

भूचुंबकत्व क्षेत्रातील संशोधनास आय.आय.जी.चे शिवाजी विद्यापीठास पूर्ण सहकार्य – डॉ. ए.पी. डिमरी 

कोल्हापूर,(प्रतिनिधी):- अवकाश आणि भूचुंबकत्वाच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध असून त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संयुक्त संशोधन प्रकल्पांना सर्वोतोपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे (आय.आय.जी.) संचालक डॉ. ए.पी. डिमरी यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त असलेल्या नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “अ‍ॅटमॉस्फिअर-आयनोस्फिअर डायनॅमिक्स: ऑब्झर्व्हेशन्स अँड डेटा अ‍ॅनालिसिस (AIDON 2025)” ही एकदिवसीय कार्यशाळा आज शिवाजी विद्यापीठात पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डिमरी बोलत होते. पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

डॉ. डिमरी म्हणाले, गेल्या दोन दिवसांत शिवाजी विद्यापीठातील एम.एफ. रडार सुविधा तसेच पन्हाळा येथील विद्यापीठाचे अवकाश केंद्र यांची पाहणी केली. या सुविधा अद्यावत असून त्याद्वारे अतिशय उत्तम दर्जाचे माहिती संकलन या दोन्ही ठिकाणी होत आहे. तथापि, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी केवळ या माहितीवर अवलंबून न राहता आय.आय.जी.ला भेट द्यावी. तेथे विविध प्रकारच्या संशोधन सुविधा आणि डाटा उपलब्ध आहे. त्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन अधिक परिपूर्ण करता येईल. आय.आय.जी. येथे विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था पुरविण्यात येईल.

‘अधिक व्यापक परिषद घेऊ’

शिवाजी विद्यापीठातील संशोधन सुविधा पाहून आपण अत्यंत प्रभावित झालो असून आय.आय.जी.सह आयुका, पुणे, इस्रो इत्यादी राष्ट्रीय आघाडीच्या संस्थांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठात एक अधिक व्यापक स्वरुपाची परिषद आयोजित करण्याचा मानस निर्माण झाला आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अधिविभागाचे प्रमुख डॉ. सोनकवडे त्या कामी कळीची भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रा. आर.व्ही. भोसले यांनी पन्हाळा अवकाश केंद्र उभारणीसाठी घेतलेले परिश्रम आणि पाठपुरावा यांची माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापूरचे अवकाश संशोधन आणि भूचुंबकत्व या क्षेत्रांच्या दृष्टीने वैज्ञानिक महत्त्व नेमके काय आहे, असे प्रा. भोसले यांनी विचारले असता, त्यांनी कोल्हापूरचे भौगोलिक वैशिष्ट्य सांगितले होते. ते असे की, हे ठिकाण विषुववृत्तीय विद्युतलहरींचा अभ्यास करण्यासाठी अतिशय योग्य आहे. पृथ्वीच्या आयनोस्फिअरच्या विषुववृत्तीय प्रदेशात दिवसा पूर्वेकडे वाहणाऱ्या नॅनो विद्युत प्रवाहाची ही एक अरुंद पट्टी असते. तिचा अभ्यास करण्यासाठी येथील भूचुंबकीय वेधशाळेमधून खूप चांगली निरीक्षणे नोंदविता येतात. त्यामुळे वातावरणातील मध्य आणि उच्च स्तरांचा अभ्यास व संशोधन करणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या समग्र निरीक्षणांचा, माहितीचा योग्य वापर करून अधिकाधिक सक्षम संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय भूचुंबकत्व संस्थेसमवेत शिवाजी विद्यापीठाचे १९८६ पासून संशोधकीय सहकार्यसंबंध राहिले आहेत. येथून पुढेही ते वृद्धिंगत होत राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजीव व्हटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. ए.व्ही. मोहोळकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. सत्यजीत पाटील, डॉ. सिबा दास, डॉ. विजय कुंभार, डॉ. मक्सूद वाईकर आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत एस. गुरुबरण, डॉ. आलोक ताओरी, डॉ. सतीशकुमार, डॉ. श्रीपती, डॉ. गोपी सिमला आणि डॉ. नवीन परिहार या तज्ज्ञांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यशाळेत विषयतज्ज्ञांच्या व्याख्यानासह डेटा विश्लेषण तंत्रांवरील प्रात्यक्षिकेही झाली. कार्यशाळेत देशभरातील राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील शंभरहून अधिक युवा संशोधक, पदव्युत्तर व पीएच.डी. स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …