
no images were found
भाषा हे अभिव्यक्तीचे साधन : प्राचार्य डॉ. उत्तम पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधि):-भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. विचार,कल्पना,भावना यांना अर्थपूर्ण मूर्तरूप देण्याचे भाषा हे महत्वपूर्ण साधन आहे, असे प्रतिपादन येथील नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्सचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रसिद्ध कवी व स्वातंत्र्य सैनिक श्री.सुब्रमण्यम भारती यांच्या जयंती औचित्याने भारतीय भाषा उत्सवा निमित्त ‘भारतातील भाषिक विविधता आणि बहुभाषावाद’ या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्र-संचालक डॉ.के.बी.पाटील होते. यावेळी उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे, समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर, मराठी विषयाचे सहा. प्राध्यापक डॉ.पी.एस.लोंढे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले की, भाषेची प्रगती समाजाच्या प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरते. म्हणून भाषा ही सामाजिक प्रगतीचा पुरावा आहे. मानवी विकास भाषिक विकासावर अवलंबून आहे. भाषा ही मानवी जीवनातून नाहीशी केली तर मानवी जीवनाला महत्व राहणार नाही. मानवी समाज हा भाषेशिवाय एकरूप होवू शकत नाही. भाषा ही त्या त्या समाजाची ओळख असते.
समाज आणि भाषा हे परस्परावर अवलंबून असतात. एखाद्या समाजाची व खऱ्या अर्थाने राष्ट्राची प्रगती त्या राष्ट्राच्या भाषेने केलेल्या प्रगतीवर ठरली जाते. याबाबत इंग्रजी भाषेला उदाहरण म्हणून पाहता येईल. त्यामुळे भाषा आणि समाज एक रेषीय प्रगती करत असतो. असे प्राचार्य डॉ.पाटील सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स व कॉमर्सचे मराठी विभाग प्रमुख डॉ.अरुण शिंदे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.प्रकाश बेळीकट्टी यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ.नितीन रणदिवे यांनी केले व आभार डॉ.संजय चोपडे यांनी मानले.