
no images were found
सोनी सब च्या कलाकारांचे 2025 या नववर्षाचे संकल्प
2025 हे वर्ष अगदी दाराशी येऊन ठेपले आहे. नववर्षाचे स्वागत करताना, सोनी सबचे कलाकार आपल्या आकांक्षा आणि नवीन वर्षासाठी केलेला संकल्प शेअर करत आहेत. आपल्या विकासाला प्राधान्य देण्यापासून ते नवीन सर्जनशील उपक्रमांचा पाठपुरावा करण्यापर्यंत या कलाकारांनी स्वतःसाठी काही प्रेरणादायक लक्ष्ये निश्चित केली आहेत. ‘वागले की दुनिया’ आणि ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत काम करणारे कलाकार परिवा प्रणती, नवीन पंडिता आणि गरिमा परिहार आगामी वर्षासाठी आपण काय काय करण्याचे योजले आहे, हे सांगत आहेत. या संकल्पांवरून त्या कलाकारांची आपल्या व्यक्तिगत विकासाबाबतची निष्ठा आणि प्रेक्षकांना आपल्या अभिनयातूनच नाही तर वास्तव जीवनातून प्रेरित करण्याची आणि 2025 हे एक सकारात्मक, विकासशील आणि अर्थपूर्ण संबंधांचे वर्ष बनवण्याची इच्छा दिसून येते.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते, “2024 वर्ष संपत आले आहे. मी जेव्हा या वर्षासाठी केलेल्या संकल्पांचा विचार करते, तेव्हा मला हे जाणवते की, ते सर्वच संकल्प मी पूर्ण करू शकले नाही, विशेषतः काम आणि व्यक्तिगत समय यांच्यात समतोल साधण्याचा संकल्प. हाच संकल्प मी 2025 या वर्षात पुढे नेण्याचे ठरवले आहे. नवीन वर्षात मी माझ्या व्यक्तिगत विकासावर, एका निरोगी जीवनशैलीचा अंगिकार करण्यावर आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्यावर विशेष लक्ष देणार आहे. नवीन छंद मला शोधायचे आहेत आणि खूप व्यस्त जीवनात देखील स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ काढायचा आहे. संकल्प म्हणजे अत्यंत निष्ठेने, नेमाने एखादी गोष्ट करणे. त्या दृष्टीने उचललेले छोटेसे पाऊल देखील तुम्हाला प्रगतीकडे नेणारे असते. 2025 मधील संधींचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि स्वतःमध्ये निरंतर सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असेल.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विन पटेलची भूमिका करणारा नवीन पंडिता म्हणतो, “कामाच्या दृष्टीने हे वर्ष खूपच धकाधकीचे होते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याला मला प्राधान्य देता आले नाही. माझी दिनचर्या इतकी व्यस्त होती की, शारीरिक स्वास्थ्याकडे मला लक्ष देता आले नाही तसेच मानसिक शांतीसाठी वेळ काढता आला नाही. आगामी वर्षात माझी जीवनशैली संतुलित करण्याचे, नियमित व्यायाम करण्याचे आणि मानसिक स्वास्थ्यासाठी पुरेसा वेळ देण्याचे माझे लक्ष्य आहे. शरीर आणि मन दोन्ही निरोगी असेल, तर तुम्ही सगळे काही उत्तम प्रकारे करू शकता. यापुढे मला हीच माझी प्राथमिकता ठेवायची आहे.”
‘वागले की दुनिया’ मालिकेत वंदना वागले ही व्यक्तिरेखा साकारणारी परिवा प्रणती म्हणते, “’वागले की दुनिया’च्या शूटिंगमध्ये आम्ही इतके व्यस्त होतो की, वर्ष कधी संपले कळलेच नाही. यावर्षी मी देखील काही कथानके लिहिली. माझ्यासाठी तो सुंदर अनुभव होता. अर्थपूर्ण काम करणे आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणे हा या वर्षातला सगळ्यात सुंदर भाग होता. पुढील वर्षात चांगले काम करणे, खूप गोष्टी लिहिणे, माझ्या कुटुंबाची काळजी घेणे आणि प्राण्यांची सेवा करणे हे माझे लक्ष्य आहे. आनंदी आणि सकारात्मक राहणे हा देखील या प्लानचा मोठा भाग आहे.”