Home राजकीय शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू ;राजेश क्षीरसागर

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू ;राजेश क्षीरसागर

29 second read
0
0
37

no images were found

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू ;राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून, राज्यात महायुती सरकारने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि लाडक्या बहिणींचे आभार मानतो. यासह माझ्या विजयात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या प्रसिद्धी माध्यम, पत्रकार बंधू- भगिनी, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आर.पी.आय.(ए), पी.आर.पी. सह सर्वच मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वच हिंदुत्ववादी संघटना, शहरातील विविध तालीम संस्था मंडळाचे कार्यकर्ते, विविध समाजाचे प्रतिनिधी समाज बांधव, वकील, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, क्रीडाई, व्यापारी, उद्योजक, आर्किटेक्ट, रिक्षावाले, फेरीवाले, कर्मचारी, मित्रमंडळी, नातेवाईक व हितचिंतकांचे जाहीर आभार मानत असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

     दि.६ मे १९८६ पासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी कामास सुरवात केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत मी वरिष्ठ म्हणून काम करत आहे. गेली ३८ वर्षे मी शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. २००९ ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो.त्यानंतर पुन्हा २०१४ ला आमदार झालो. २०१४ ला शिवसेना – भाजप महायुतीची राज्यात सत्ता आली. यावेळी मंत्री मंडळाच्या यादीत वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आदी माध्यमातून माझे नांव मंत्री पदासाठी अग्रेसर होते. लोकांच्यातही मला मंत्री पद मिळेल अशी चर्चा होती. पण मंत्री पदाने मला हुलकावणी दिली हे माझे व माझे मतदारसंघाचे दुर्दैव म्हणावे लागेल. २०२२ च्या सत्ता बदलानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाण्याची भूमिका घेणारा जिल्ह्यातील पहिला शिवसैनिक मी होतो. सगळे मोर्चे मी अंगावर घेत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारानुसार मा.एकनाथ शिंदे यांची असलेली भूमिका जनतेत मांडली आणि शहरामध्ये मा.शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढविली. यामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे, शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून केलेले काम, लाडकी बहीण योजनेसाठी शहरात राबविलेली शिबिरे, शाश्वत विकास परिषदेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी केलेलं प्रयत्न असोत. यासह शिवसेनेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात यशस्वी करण्यात मुख्य भूमिका पार पाडली आहे. तिन्ही वेळेला झालेल्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कोल्हापुरातून शिवसैनिक उपस्थित ठेवणे असो वा विविध विकास कामांच्या माध्यमातून शिवसेनेचे काम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविले. त्याचमुळे शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा नव्या दमाने उभी राहिली. यासह महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभही यशस्वी करून दाखविला. या सर्वांचाच परिपाक म्हणून शिवसेनेसह महायुतीच्या दहाही जागा निवडून आल्या.   

        कोल्हापूर उत्तर विधानसभेची माझी निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरली. सुरवातीलाच कॉंग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे कॉंग्रेसचे चिन्हच या मतदारसंघातून गायब झाले. त्यानंतर मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी जाहीर पाठींबा दिला. माजी दिवंगत मंत्री कै.दिग्विजय खानविलकर यांच्या पत्नी व सुपुत्रांनी मला व महायुतीला पाठींबा दिला. याचमुळे माझी निवडणूक लक्षवेधी ठरली आणि याचा परिणाम राज्याच्या निवडणुकीवर झाला.

       गेली ३८ वर्षे मी पक्ष वाढीसाठी एकनिष्ठपणे अहोरात्र काम करत आहे. वास्तविक पाहता आमदारकीची तिसरी टर्म तसेच मंत्री दर्जा पदाच्या कामाचा अनुभवानुसार मला मंत्री पद निश्चित होणे क्रमप्राप्त होते. परंतु नवख्यांना संधी दिल्याने २०१४ आणि आताच्या स्थितीलाही माझी मंत्री पदाची संधी हुकली. याचा दोष मी वरिष्ठांना देत नसून, हा माझे आणि माझ्या मतदारसंघाच्या नशिबाचा दोष आहे. गेल्या अडीच वर्षात वरिष्ठांच्याकडून काही शब्द लोकप्रतिनिधी देण्यात आले होते. ते पूर्ण झाले त्याचप्रमाणे मलाही २०१४ पासून वरिष्ठांनी मंत्री पदाबाबत शब्द दिले आहेत, आताही या निवडणुकीत देण्यात आले होते हे शब्द कधी पूर्ण होणार असा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे.गेल्या अडीच वर्षाचा विचार करता मा.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधीचा निधी शहर व जिल्ह्याच्या विकास कामाना देवून मी माझी कार्यपद्धती सिद्ध केली आहे. मंत्री पद असते तर आणखी जोमाने शहर आणि जिल्ह्याच्या विकासाठी काम करता आले असते. यासह शिवसैनिकांनाही न्याय देण्यास देण्यास यशस्वी झालो असतो. परंतु, यावर आता थोड्याफार प्रमाणात मर्यादा येणार असल्याने मनाला खंत वाटते. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची कोणतेही आंदोलन असो वा कार्यक्रम नेहमीच शहरातील शिवसैनिक अग्रभागी राहिली आहेत. परंतु सध्या शिवसेना वाढविण्यासाठी राबलेल्या शिवसैनिकांना न्याय देवू शकत नसल्याचे दुख वाटते.

       पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वन नेशन वन इलेक्शन होणार असल्याने मुदतीच्या सहा महिन्यापूर्वीच पुढच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे पुढील दोन वर्षांनी आम्हाला मंत्री पद द्यावे, जेणेकरून आमच्या पदास न्याय मिळेल, अशी भूमिका आम्ही वरिष्ठ नेत्यांसमोर मांडणार आहोत. 

         त्यामुळे आगामी काळात माझ्या शहराच्या विकासासाठी हद्दवाढ, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, आय.टी. पार्क, फौंड्री हब, औद्योगिक क्षेत्रांचा विकास, ३२०० कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प, पंचगंगा प्रदूषण, झूम प्रकल्प, राजाराम बंधारा नवीन पुलाचे काम, रंकाळा तलावाचे उर्वरित सुशोभिकरण, पर्यटन वाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, फुटबॉल अॅकॅडमी, शहरातील रिंग रोड, वाहतूक यंत्रणा, पार्किंग, भुयारी मार्ग, महापालिका गाळेधारक प्रश्न, के.एम.टी.कर्मचारी सेवेत कायम करणे आदी बाबत पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …