
no images were found
युवा कलाकार श्रेया पटेल आणि त्रिशान झळकणार सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेत!
‘तेनाली रामा’ ही मालिका, तेनालीच्या बुद्धीचातुर्याच्या नवीन गोष्टी घेऊन 16 डिसेंबरपासून सोनी सबवर परतत आहे. तेनाली रामा हे पात्र आजही प्रेक्षकांना मोहित करते. त्याच्या जोडीला आणखी काही नवी पात्रे मालिकेत दाखल होत आहेत. पद्मावती, लच्छम्मा, बाल भद्र आणि वाचस्पती या चार लहान मुलांना तेनाली मार्गदर्शन देताना दिसणार आहे.
सुपरिचित बाल कलाकार श्रेया पटेल आणि त्रिशान यांना अनुक्रमे पद्मावती आणि वाचस्पती यांच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. ही दोन गुणी भावंडे आहेत. आपल्या माता-पित्यापासून अलग झाल्यावर अवघ्या तेराव्या वर्षी पद्मावती आपल्या धाकट्या भावाची आणि त्याच्या समूहाची जबाबदारी आपल्या अंगावर घेते. त्या सगळ्यांना एकजूट ठेवण्यासाठी तिची हुशारी, आत्मविश्वास आणि तडफदार स्वभाव कामी येतो. सहा वर्षांच्या वाचस्पतीकडे असामान्य वक्तृत्व कौशल्य आणि विलक्षण स्मरणशक्ती आहे. त्यामुळे रहस्यांचा शोध घेण्याची अफाट स शक्ती त्याच्यात आहे. या मुलांमधील असामान्य क्षमता ओळखून तेनाली त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येतो. त्याच्यातील गुणांची जोपासना करून विजयनगर राज्याच्या रक्षणासाठी तो या मुलांना तयार करतो.
तेनाली रामा मालिकेत पद्मावतीची भूमिका करणारी श्रेया पटेल म्हणते, “पद्मावती एक मस्त व्यक्तिरेखा आहे. तिचा आत्मविश्वास आणि हुशारी मला फार आवडते. माझी आई मला बऱ्याचदा तेनाली रामाच्या गोष्टी सांगते. मला त्या फार मनोरंजक आणि मजेदार वाटतात. मला कधीच वाटले नव्हते की पद्मावतीच्या रूपाने मला या मालिकेत दाखल होता येईल. मला खूपच छान वाटते आहे. तिची कहाणी जिवंत करण्याची तसेच तेनालीच्या प्रवासातून शिकण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद वाटतो.”
तेनाली रामा मालिकेत वाचस्पतीची भूमिका करणारा त्रिशान म्हणतो, “वाचस्पती चुणचुणीत आणि दयाळू स्वभावाचा आहे. तो असे काही बोलतो, की तुम्हाला विचार करावा लागेल! लहानपणापासून ज्याच्या गोष्टी मी ऐकल्या ते पात्र साकारताना मजा येणार आहे. मला सगळ्यांचे प्रेम मिळावे आणि सगळ्यांनी आमची मालिका बघावी हीच माझी इच्छा आहे.”