6 second read
0
0
26

no images were found

२३ डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘तू ही रे माझा मितवा’. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेत ईश्वरी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत तिने साकारलेल्या गुंजा या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. तू ही रे माझा मितवा मालिकेतल्या ईश्वरी या भूमिकेविषयी शर्वरीने काही खास गोष्टी सांगितल्या.

शर्वरी जोगने तू ही रे माझा मितवा मालिकेच्या निमित्ताने आत्मसात केलीय नवी भाषा

शर्वरी, मुख्य नायिकेची भूमिका असलेली ही तुझी दुसरी मालिका. या मालिकेचं काय वेगळेपण आहे?

स्टार प्रवाहसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय याचा मनापासून आनंद आहे. तू ही रे माझा मितवा मालिकेत एक अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळेल. अनोखी यासाठी कारण ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या प्रेमात जितके आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. मला खात्री आहे प्रेक्षकांना ही हटके लव्हस्टोरी नक्की आवडेल.  

 

या मालिकेतल्या तुझ्या पात्राविषयी….

ईश्वरी एक अत्यंत मनस्वी आणि निरागस मुलगी आहे. ती जे काही करते ते मनापासून आणि जीव ओतून. तिचा देवावर खूप विश्वास आहे. श्रद्धेने एखादी गोष्ट मागितली तर ती मिळते अशी तिची धारणा आहे. ती बुजरी, साधी मुलगी असली तरी तिने एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वाला नेतेच. कोणतीही गोष्ट साध्य झाल्याशिवाय ईश्वरी प्रयत्न करणं सोडत नाही. ईश्वरीच्या चेह-यावर नेहमी हास्य असतं. ती खूप स्वप्नाळू आहे. सिनेमे बघायला तिला खूप आवडतात. ती शाहरुखची फॅन आहे. त्याचे सिनेमे बघण्यासाठी ती काय वाट्टेल ते करायला तयार असते. तिला असं वाटतं की प्रत्येक नवरा बायकोचं नातं हे शाहरुख आणि त्याच्या सिनेमातल्या हिरॉईनसारखंच असतं. माझ्या स्वभावाच्या पूर्ण वेगळं असं हे पात्र आहे त्यामुळे काम करताना खूप मज्जा येतेय. 

 

शर्वरी तू मुळची कोल्हापुरची पण मालिकेच्या निमित्ताने नवनव्या भाषा आत्मसात केल्या आहेत त्याविषयी काय सांगशिल?

होय खरं आहे. स्टार प्रवाहच्या कुन्या राजाची गं तू रानी मालिकेच्या निमित्ताने मी आदिवासी भाषा शिकले. त्या भाषेचा वेगळा गोडवा होता. आता तू ही रे माझा मितवा मालिकेत मी इंदौरची भाषा आत्मसात करतेय. नुकतंच आम्ही इंदौरमध्ये शूटिंगही केलं. तिथल्या लोकांसोबत संवाद साधत मी नवनवे शब्द शिकलेय. आमचे निर्माते महेश तागडे देखिल मुळचे इंदौरचे आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडूनही शिकतेय.

 

मालिकेतला अर्णव म्हणजेच अभिनेता अभिजीत आमकरसोबत कशी केमिस्ट्री आहे?

अभिजीत आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम करतोय. आम्हा दोघांनाही बोलायला प्रचंड आवडतं. त्यामुळे शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आमची छान मैत्री झालीय. मालिकेत मात्र आम्हा दोघांमध्ये बरीच नोकझोक पाहायला मिळेल. आम्हा दोघांमधले सीन्स खूप छान होत आहेत. तेव्हा नक्की पहा आमची नवी मालिका तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षीरसागर

पूर आपत्ती नियंत्रणातील रु.९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता : आमदार श्री.राजेश क्षी…