no images were found
रस्त्यातले डांबर खाल्ले कोण? संदीप देसाई
कोल्हापूर (प्रतिनिधी): -नगररोत्थान योजनेतून शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याचे काम सुरु आहे. या कामाचा दर्जा राखला जावा यासाठी आवश्यक त्या चाचण्या कराव्यात यासाठी आप चा महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी रस्त्याचे दर्जा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करत ठेकेदार मे. एवरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स यांना दंडाच्या नोटीस काढल्या. दोन महिन्यापूर्वी आम आदमी पार्टीने रस्त्याचा दर्जा राखला जात नसल्याचा आरोप करत थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच केलेल्या रस्त्यांचे टेस्ट सार्वजनिक करावेत अशीही मागणी केली होती. परंतु महापालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
त्यामुळे आप ने गोखले कॉलेज ते माऊली चौक या रस्त्याचे कोअर घेऊन के आय टी कॉलेजच्या नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी दिले होते. रस्त्यातील डांबराचे प्रमाण, म्हणजेच बिटूमीन कंटेन्ट 4.5% इतके आवश्यक असताना या टेस्टमध्ये ते फक्त 3.76% इतके असल्याचा खळबळजनक खुलासा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.
गटर चॅनेलची कामे रस्ता करण्याआधी न करणे, सेन्सर मशीन न वापरणे, जबाबदार अधिकारी साईटवर उपलब्ध नसणे यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार होत असल्याचा आरोप आप ने केला. या कामासाठी संदीप गुरव अँड असोसिएट यांची नेमणूक केली आहे. रस्त्याची मापे घेणे, डिझाईन प्रमाणे काम करून घेणे, दर्जा राखण्यासाठी आवश्यक ते टेस्ट करण्यासाठी समन्वय साधने या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. परंतु त्यामध्ये कसूर होताना दिसत आहे.
सुमार दर्जाचे काम होऊनही या ठेकेदाराचे तब्बल 10 कोटी 16 लाख इतके बिल महापालिकेने का अदा करणारे अधिकाऱ्यांचे काय साटेलोटे आहे का, शहरातील रस्त्यांचे डांबर खाणारे अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, सब-ठेकेदार, लोकप्रतिनिधी की आणखीन कोण असा प्रश्न आप पदाधिकारी यांनी उपस्थित केला.
कामाचा दर्जा सुधारावा अन्यथा ठेकेदार बदलावा अशी मागणी प्रशासकांकडे करणार असल्याचे आप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयुर भोसले, समीर लतिफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.