no images were found
उपमन्यू चॅटर्जी लिखित ‘लॉरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाइफ’ला ‘जेसीबी पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली : ‘स्पीकिंग टायगर बुक्स’ने प्रकाशित केलेल्या उपमन्यू चॅटर्जी लिखित ‘लॉरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाइफ’ या पुस्तकाला यंदाचा जेसीबी पुरस्कार आणि २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. वल्लभगड येथील ‘जेसीबी इंडिया’च्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ठुकराल आणि तगरा या दिल्लीच्या कलावंतांनी ‘मिरर मेल्टिंग’ या नावाने साकारलेली ही प्रतिष्ठेची ट्रॉफी चॅटर्जी यांना प्रदान केली.
‘जेसीबी’चे चेअरमन लॉर्ड बॅमफोर्ड यांच्या वतीने ‘जेसीबी इंडिया’चे सीईओ आणि एमडी दीपक शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘भारतीय साहित्याचा गौरव करण्यासाठी लॉर्ड बॅमफोर्ड यांनी जेसीबी पुरस्काराची संकल्पना मांडली होती. गेल्या काही वर्षांत या पुरस्काराने अनेक साहित्यकृतींना गौरविण्यात आले आहे. यंदाचे वर्षही यापेक्षा वेगळे नाही. उपमन्यू चॅटर्जी यांचे मी जेसीबी परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो,’ असे शेट्टी यांनी नमूद केले.
‘प्रादेशिक भाषांमधील समकालीन भारतीय साहित्यात वाचकांना देण्यासारखे बरेच काही आहे. उच्च दर्जाच्या भाषांतरांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रकाशक महत्त्वाची भूमिका बजावतात; जेणेकरून हे साहित्य वाचकांना त्यांच्या आवडीनुसार उपलब्ध होईल. लेखन आणि साहित्य या दोन्हीकडे पाहण्याचा भारताचा विकसित होत असलेला दृष्टिकोन पुढील काळात वाचनाचे आणखी रोमांचक अनुभव देणारा ठरेल,’ असेही शेट्टी म्हणाले.
पुरस्काराच्या प्रवासाबद्दल बोलताना साहित्यिक आणि दिग्दर्शिका मिता कपूर म्हणाल्या की,‘जेसीबी साहित्य पुरस्काराच्या आजवरच्या परंपरेची साक्षीदार होणे, ही खरोखरच गौरवाची बाब आहे. हा पुरस्कार भारताच्या साहित्यिक विश्वाला आकार देणाऱ्या अपवादात्मक आवाजांचा उत्सव आहे. वर्षागणिक हा पुरस्कार लेखक आणि भाषांतरकार यांचे कौशल्य, सर्जनशीलता आणि समर्पणाचा सन्मान करण्याच्या आपल्या बांधिलकीला पुन्हा अधोरेखित करतो.’