no images were found
मतदार जनजागृती (SVEEP) उपक्रमांमुळे वाढला टक्का
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांनी मतदान करुन सहभाग नोंदवावा व लोकशाही बळकटीकरणासाठी हातभार लावावा यासाठी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर मतदार जनजागृतीसाठी स्वीप टीमची नियुक्ती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्याकडून जिल्हास्तरीय स्वीप पथकाची नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये आयुक्त महानगरपालिका के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. स्वीप उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले. तसेच काही उपक्रमास स्वत: उपस्थित राहून मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे व जिल्ह्याला राज्यामध्ये आघाडीवर ठेवण्याची कायम राखण्यासाठी आवाहन केले. याचा सकारात्मक परिणाम 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानामध्ये दिसून आला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 76.63 टक्के इतके विक्रमी मतदान होवून राज्यात प्रथम क्रमांकावर जिल्हा राहीलेला आहे.
जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी स्वीपमार्फत राबविण्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कमी मतदान झालेल्या क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रकारचे फ्लेक्स, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये चमकणारे खेळाडू आयकॉन व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, जिल्हयातील सर्व तालुक्यात असणाऱ्या फ्लॅट व प्लॉट टाईपच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून जनजागृती, संकल्पपत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील 3 हजार 85 प्राथमिक व माध्यमिक शाळातील 2 लाख 51 हजार 278 विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांस पत्र देवून मतदान करण्यासाठी आवाहन केले, औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कामगारांसाठी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमांतून जनजागृती केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्टीकरच्या माध्यमतातून मतदानाचे आवाहन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व ग्रामसुरक्षा यंत्रणामार्फत जिल्हाधिकारी, आयुक्त, महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, व पोलीस निरीक्षक यांचे मेसेज ब्रॉडकास्ट करण्यात आले. सायकल रॅलीच्या माध्यमातून सर्व मतदारसंघात जनजागृती करण्यात आली.
ऑनलाईन ई- मतदार प्रतिज्ञा मध्ये 11 लाख 37 हजार 300 मतदान करण्याबाबतची प्रतिज्ञा घेतली. यामध्ये शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच फॅक्टरी कामगार व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यांनीही शपथ घेतली. जिल्ह्यातील 8 शहरामध्ये एकाच वेळी लोकशाही दौड घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 7 हजार धावपटूनीं सहभाग घेतला. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांमार्फत मानवी साखळी रांगोळीचे आयोजन करण्यात आले. एस.टी. बस स्थानकवर प्रवाशांसाठी फ्लेक्स, कंडक्टरमार्फत बसमध्ये जनजागृती, उद्घोषणा, जिंगल्स, स्टीकर्स लावण्यात आले व जिल्हाधिकारी, आयुक्त महानगरपालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एस.टी.स्थानकावर प्रत्यक्ष भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधला. तसेच रेल्वे स्टेशन व विमानतळ येथेही वरील प्रमाणे जनजागृती केली. राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांसाठी फ्लेक्स, आंतरराज्यीय व आंतरजिल्हयावरती विशिष्ट फ्लेक्स व टोलनाक्यांवरती फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती केली.
वस्तु व सेवा कर व आयकर विभागांमार्फत व्यावसायिकांना दूरदृषप्रणालीव्दारे सभा व ई-मेलव्दरे मतदान करण्याबाबतत जनजागृती केली. वन विभागामार्फत दुर्गम भागातील गावांमध्ये जनजागृती, जिल्हाधिकारी, आयुक्त ,महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांचा जनजागृतीबाबत व्हिडिओ सिनेमापूर्वी जिल्ह्यातील सर्व सिनेमागृहामध्ये प्रसारीत करण्यात आला.
मतदान केलेल्या व दिव्यांग, वय वर्षे 85 वरील व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. रेडिओ मार्फत जिल्हाधिकारी यांची मुलाखत, स्वीपमार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची प्रसिध्दी केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पथनाटय, वादविवाद स्पर्धा, रिल्स स्पर्धा, तर माध्यमिक विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी, सायकल रॅली, पालकांना संकल्प पत्र, रांगोळी स्पर्धा तर प्राथमिक विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी व्दारे जनजागृती करण्यात आली.
कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये डिजीटल व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील 5 लाख 56 हजार 233 कुटूंबांना भेटी देवून मतदान करण्याबाबत संदेश 15 लाख 3 हजार 763 मतदारापर्यंत पोहोचवला. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमार्फत व शहरी भागांमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत घरभेटी दिल्या. जिल्ह्यामध्ये विविध संकल्पनावर आधारित 143 विशेष मतदान केंद्र (थिमॅटीक) उभारण्यात आली होती. याचबरोबर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रामध्ये घंटागाडीवर जिंगल्सव्दारे प्रसिध्दी, जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघामध्ये मतदार जनजागृती पोवाडा कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले.
कोल्हापूर शहरातील 501 मतदान केंद्रांवर मतदानासाठी किती मतदार रांगेमध्ये आहेत याची माहिती क्यू मॅनेजमेंट पोर्टलद्वारे मतदारांना उपलब्ध करुन देण्यात आली. सोने चांदी व्यापारी, टी स्टॉल, नाभिक संघटना यांनी मतदान केलेल्या मतदारांसाठी सवलती जाहीर केल्या. मतदानादिवशी ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान होत असल्याचे निदर्शनास आले, त्या क्षेत्रामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्थानिक अधिकारी व कर्मचा-यांनी मतदान वाढीसाठी प्रयत्न केले.