no images were found
मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची 50 किलोमीटर सायकल रॅली
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी केवळ तीन दिवस बाकी असताना जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृती करून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदान जनजागृतीसाठी आज शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत इतर दहा सायकल स्वरांनी कोल्हापूर, उचगाव, मुडशिंगी, पट्टणकोडोली, हुपरी व परत कोल्हापूर असा पन्नास किलोमीटर अंतराचा सायकल प्रवास केला. या सायकल रॅलीला सकाळी सात वाजता पोलीस ग्राउंड, कोल्हापूर येथून सुरुवात झाली व त्याच ठिकाणी दहा वाजता सांगता झाली.
या सायकल रॅली दरम्यान प्रत्येक गावामध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन 20 नोव्हेंबर रोजी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. पट्टणकोडोली, हुपरी, टेंबलाईवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सायकल स्वारांचे स्वागत केले. तसेच मतदान करण्याविषयी घोषणा देऊन मतदार जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवला. हुपरी येथील लोकसेवक आ.बा. नाईक सिल्वर सिटी इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीबाबत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या समोर पथनाट्य सादर केले.