no images were found
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ हजारोंच्या संख्येने सहभाग
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्रयात 80 टक्क्यांहून अधिक मतदान होऊन मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्रयातील महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, अन्य विभाग व राज्य शासकीय, निम शासकीय कार्यालयांतील अधिकारी व हजारो कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. “आम्ही, भारताचे नगारीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याव्दारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू…..” अशा आशयाची शपथ आज घेण्यात आली.
आतापर्यंत 4 लाख 95 हजार मतदारांनी घेतली ई प्रतिज्ञा
कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या वेबसाईटवर ऑनलाइन ई – प्रतिज्ञा घेऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाची ई-प्रतिज्ञा घेण्यासाठी https://evoterpledgekolhapur.com/form.php या लिंकचा वापर करावयाचा आहे. ही ई- प्रतिज्ञा घेणाऱ्या प्रत्येक मतदारास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी स्वाक्षरीत केलेले प्रमाणपत्र तात्काळ ऑनलाईन मिळणार आहे. आतापर्यंत 4 लाख 95 हजार मतदारांनी ई प्रतिज्ञाघेतली असून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी ही प्रतिज्ञा घ्यावी, जेणेकरुन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी ई- प्रतिज्ञा घेतली जाईल आणि मतदानासाठी जनजागृती होवून जिल्ह्यात जास्त टक्यांनी मतदान होईल.