
no images were found
देशातील तरुणांसाठी कौशल्य विकास मोहिम,राष्ट्रीय शिक्षण दिनी टोयोटा किर्लोस्कर मोटरचा पुढाकार
देशातील तरुणांची कौशल्यातील दरी दूर करत त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाने पुढाकार घेत समाजाविषयी आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली केली. राष्ट्रीय शिक्षण दिनाचे निमित्त साधून समुहातर्फे संपूर्ण देशातील आर्थिकदृष्ट्या वंचित तरुणांना सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मोहिमे अंतर्गत टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाने शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. रोजगाराचे नवीन मार्ग तयार करताना स्वावलंबनाला चालना देऊन देशाच्या औद्योगिक विकासात योगदान देता यावे, हा त्यामागचा उद्देष आहे.
2007 मध्ये स्थापन टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाच्या मिशनचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळात या माध्यमातून ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील तरुणांना मोफत, उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करीत आहेत.
संस्थेमार्फत तीन वर्षांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. यात तरुणांना केवळ तांत्रिक कौशल्येच प्रदान केले जात नाहीत तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. हा निवासी अभ्यासक्रम प्रशिक्षण, जागतिक उत्पादन पद्धतींची सखोल माहिती, भौतिक आणि समुदाय विकासासाठी सक्रिय सहभाग यावर मुल्यांवर भर देतो.
ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या कुशल तंत्रज्ञांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यासाठी, टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाने (TKM ) ने अलीकडेच टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (TTTI) मधील प्रशिक्षणार्थींची क्षमता 1,200 विद्यार्थ्यांपर्यंत दुप्पट केली आहे. यात 600 महिला विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा आहेत. संस्था निवासी सुविधा, प्रगत वर्गखोल्या आणि तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून दिले जाते.
‘स्किल इंडिया’शी असलेल्या वचनबद्धतेनुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाने (TKM ) “शिका आणि कमवा” मॉडेल अंतर्गत दोन वर्षांचा टोयोटा कौशल्य कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (TTTI) च्या नियमित सेवेला पूरक आहे. यात विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण घेत असताना उत्पन्न मिळवण्याची संधी देखील प्रदान केली जाते. नोकरीवर आधारित उच्च तांत्रिक प्रशिक्षण हा या प्रशिक्षणाचा केंद्रबिंदू आहे.
याची आणखी माहिती देताना टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहाचे कार्यकारी अध्यक्ष (वित्त आणि प्रशासन) श्री. जी. शंकरा म्हणाले, समाजाविषयी असलेली बांधिलकी आणखी वृद्धींगत करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण दिनापासून सर्वांसाठी समान संधी या तत्वावर ही व्यापक मोहिम सुरू करण्यात आली. दर्जेदार तांत्रिक शिक्षण आणि सर्वसमावेशक कौशल्य विकास या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. जेणे करून तरुणांनी आत्मसात केलेले कौशल्य समाजात सक्षम, उत्पादक सदस्यांमध्ये बदलावे, हे आमचे ध्येय आहे.
याव्यतिरिक्त देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने भविष्यातील ऑटोमोटिव्ह व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर समुहातर्फे प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत समुहाने देशात 60 प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. ज्यामध्ये आजघडीला देशभरात 13,000 पेक्षा जास्त विद्यार्थी अद्ययावत ऑटोमोबाईल प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. देशात विखुरलेल्या टोयोटा डीलरशिपमधील व्यावहारिक कौशल्य विकासावर आधारित हा मजबूत तांत्रिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि उद्योग-मानक पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देतो.