no images were found
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार – एस.चोक्कलिंगम
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या 4 हजार 140 असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली.
मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते.
श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 असा होता. त्यानुसार 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 7,078 इतके नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण 2,938 अर्ज मागे घेण्यात आले.
मतदार नोंदणीत वाढ
दि.30 ऑक्टोबर रोजी अद्ययावत मतदारांची संख्या 9,70,25,119 असून यामध्ये पुरुष मतदार 5,00,22,739 तर महिला मतदार 4,69,96,279 आहे. तर 6,101 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग (PwD Voters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या 1,16,170 आहे.
राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात 1,181 मतदान केंद्रे
मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604 तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.
ईव्हीएम व्हीव्हीपॅट EVM-VVPAT
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदारसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर १०० मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.